सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे अखंड सावधान रहा ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ एक इहवादी, सामाजिक आणि राजकीय संकल्पना’ या पुस्तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !
पुणे – कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यानंतर गोहत्याबंदी कायदा काढून टाकला, मंदिरांचे अनुदान बंद केले, टिपू सुलतान जयंतीचे उदात्तीकरण केले, आता विधीमंडळातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र काढले जाणार आहे. भाजप सत्तेतून गेल्याचे असे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे आपण ‘अखंड सावधान’ असणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपच्या युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तेजस्वी सूर्या यांनी केले. भारतीय विचार साधना आणि ‘स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थे’च्या वतीने अक्षय जोग लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ एक इहवादी, सामाजिक आणि राजकीय संकल्पना’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते झाले, तसेच या वेळी ‘भारतीय विचार साधना’ या संकेतस्थळाचेही लोकार्पण झाले. या वेळी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, ‘भारतीय विचार साधना’चे अध्यक्ष गिरीश आफळे, श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. तेजस्वी सूर्या पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनेक दशकांपूर्वीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. त्याचा प्रभाव केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण, परराष्ट्र धोरण यांत प्रकर्षाने दिसून येतो. सावरकर हे क्रांतीकारक, कवी, विचारवंत, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी समाजसुधारणा, इतिहासाविषयी केवळ तक्रारी केलेल्या नाहीत, तर स्वतः पुढाकार घेऊन पालट घडवण्यासाठी काम चालू केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमी ‘मी सावरकर नाही’, ‘मी माफी मागणार नाही’, असे ते बोलतात; पण १०० जन्म घेतले तरी त्यांना सावरकर होता येणार नाही, असा टोला लगावला. काँग्रेस आणि गांधी हे सावरकरांचे विचार, त्यांचे राष्ट्रप्रेम यांपासून पुष्कळ दूर आहेत.
पुस्तकाचे लेखक श्री. अक्षय जोग म्हणाले, ‘‘या पुस्तकातून सावरकरांचे हिंदुत्व कसे आहे ? काँग्रेसचा विरोध का आहे ? ‘मानवतावादी विचारवंत सावरकर’ असे अनेक पैलू या पुस्तकातून समजून घेता येतील.’’