सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीजपुरवठा केला खंडीत !

कोयना धरण

सातारा, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. अल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकारच्या निरीक्षणाविना धोम डाव्या कालव्याचे पाणी पोचत नसल्याचे सांगत कोरेगाव तालुक्यातील ५ गावांतील विद्युत् मोटारींचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू आणि बेलेवाडी या गावांचा समावेश आहे. याविषयीचे आदेश महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी रहिमतपूर पाटबंधारे कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

सांगली जिल्ह्याला कोयना आणि धोम प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. सर्व धरणे आणि पुनर्वसन सातारा जिल्ह्यातील असतांना जिल्ह्यातीलच शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. सांगली जिल्ह्यात पाणी पोचत नसल्याचे कारण देत विद्युत् मोटारींचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत. २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत वीज तोडण्याचे आदेश दिल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.