भारतात पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यास कुणालाही अनुमती नाही !
‘पशुपती क्षेत्र विकास ट्रस्ट’ने केला खुलासा !
काठमांडू (नेपाळ) – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या पशुपतीनाथ मंदिराविषयी ‘भारतामध्ये येथील पशुपतिनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यास कुणालाही अनुमती देण्यात आलेली नाही’, असा खुलासा नेपाळमधील ‘पशुपती क्षेत्र विकास ट्रस्ट’चे कार्यकारी संचालक डॉ. घनश्याम खातीवाड यांनी केला. भारतातील उत्तराखंड येथील एका गावात पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती असणारे मंदिर बांधण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावरून त्यांनी हा खुलासा केला आहे.
डॉ. घनश्याम खातीवाड पुढे म्हणाले की, हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. येथे तो पशुंचा रक्षक पशुपती या अवतारामध्ये आहे. उत्तराखंडमध्ये पशुपतीनाथ मंदिर बांधण्यात येत आहे, ही खोटी बातमी आहे. आम्ही अशा बातम्यांवर आक्षेप घेतो. पशुपतीनाथ सर्व हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या खोट्या वृत्तामुळे पशुपतीनाथवर श्रद्धा असणार्या हिंदूंना धक्का बसला आहे. अन्यत्र पशुपतीनाथ मंदिर बांधण्याची अनुमती देण्याचा कोणताही निर्णय आम्ही घेतलेले नाही.