Registration Of Foreign Tourists : कायद्यानुसार विदेशी पर्यटकांची नोंदणी करा आणि कारवाई टाळा ! – गोवा पोलीस
पोलिसांचे हॉटेल व्यावसायिकांना निर्देश
पणजी : विदेशी पर्यटकांच्या रहाण्याची व्यवस्था करणारे राज्यातील अनेक हॉटेल व्यावसायिक विदेशी पर्यटकांचा तपशील कायद्याने बंधनकारक असलेल्या वेळेनुसार ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’मध्ये नोंदवत नाहीत. पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकांना हे निदर्शनास आणून दिले आहे, तसेच कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. पोलिसांनी हॉटेल, गेस्ट हाऊस, व्यक्तीगत आणि सर्व्हिस अपार्टमेंट यांच्या मालकांना ‘विदेशी पर्यटक निवासाला आल्यावर २४ घंट्यांच्या आत त्यासंदर्भातील ‘सी-फॉर्म’ विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
कायद्यानुसार ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’च्या संकेतस्थळावर ऑनलाईन ‘सी-फॉर्म’ प्रणालीमध्ये विदेशी पर्यटकांचा तपशील नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. ‘याचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास विदेशी कायद्याच्या अंतर्गत खटला भरण्यात येईल. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी लवकरात लवकर पोर्टलवर ‘सी-फॉर्म’ भरण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी’, असे नमूद केले आहे.