#Exclusive : महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या योजनांमुळे एस्.टी.ची भरभराट !

  • राज्यातील ६३ कोटी ५२ लाख नागरिक लाभार्थी !

  • ‘महिला सन्मान योजना’ ठरली इतिहासातील सर्वाधिक यशस्वी योजना !

मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) : कोरोना महामारी आणि एस्.टी. कर्मचार्‍यांचा प्रदीर्घ संप यानंतर सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एस्.टी.कडे वळवण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ‘महिला सन्मान योजना’ आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ या योजना चालू केल्या. या योजनांमुळे एस्.टी.ला तब्बल २ सहस्र २११ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक लाभ झाला. या दोन्ही योजनांचा आतापर्यंत ६३ कोटी ५२ लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे.

१. सर्व वयोगटातील महिलांना एस्.टी.च्या प्रवासात ५० टक्के सवलत देणारी ‘महिला सन्मान योजना’ महाराष्ट्र शासनाने १७ मार्च २०२३ पासून चालू केली. या ८ मासांच्या कालावधीत ४२ कोटी २५ लाख ६२ सहस्र ३६४ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यातून एस्.टी. महामंडळाला १ सहस्र ११९ कोटी ५७ लाख ६७ लाख ९७५ रुपये प्राप्त झाले.

‘महिला सन्मान योजना’ इतिहासातील सर्वाधिक यशस्वी योजना !

या विविध योजनांतून मिळणारे अर्थार्जन पहाता एस्.टी.च्या इतिहासात ‘महिला सन्मान योजना’ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेपेक्षाही अल्प कालावधीत महिला सन्मान योजनेने एस्.टी.ला सर्वाधिक आर्थिक लाभ प्राप्त करून दिला आहे.


२. यासह ७५ वर्षे वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य प्रवास असणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ महाराष्ट्र शासनाने २६ ऑगस्ट २०२२ पासून चालू केली. ‘६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास’ ही एस्.टी.ची योजना यापूर्वीपासून राज्यात लागू आहे. या योजनांतून मागील १५ मासांत एस्.टी. महामंडळाला १ सहस्र ९२ कोटी ३७ लाख ३ सहस्र ५४० रुपये इतका आर्थिक लाभ झाला, तर २१ कोटी २६ लाख ४२ सहस्र ९२ नागरिकांनीही या योजनांचा लाभ घेतला.


हे ही वाचा –

♦ Exclusive : खासगीकरण नव्हे, ‘एस्.टी.’ महाराष्ट्र शासनाचीच रहाणार !
https://sanatanprabhat.org/marathi/740934.html