पैठण येथील सोहळ्यात प.पू. शांतिगिरी महाराजांना ‘महाभागवत’ उपाधी प्रदान ! 

प.पू. शांतिगिरी महाराजांना (डावीकडे) ‘महाभागवत’ ही उपाधी प्रदान करतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ह.भ.प. श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती सुवर्ण महोत्सव निमित्त श्रीक्षेत्र पैठण येथे २२ नोव्हेंबर या दिवशी ‘अखंड हरिनाम सप्ताह सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीमहाराजांचे उत्तराधिकारी आणि जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी समर्थ सद्गुरु श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीमहाराज यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत अन् शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या हस्ते ‘महाभागवत’ ही विशेष उपाधी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या वेळी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज यांनी प्रस्तावना करतांना सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथाचे अभ्यासक आणि या ग्रंथाला प्राण मानणार्‍या समर्थ सद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या कार्याविषयी विशेष शब्दांत गौरव केला.