हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता ! – दत्तात्रेय होसाबळे, सरकार्यवाह, रा.स्व.संघ
‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’
बँकॉक (थायलंड) – हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता असून यासाठी समन्वय, परस्पर सहयोग, माहितीची आदान-प्रदान आदी आवश्यक आहे. हिंदु संस्कृतीने जगाला प्रचंड प्रमाणात योगदान दिले आहे. आपल्याला मानवतेवर खर्या अर्थाने प्रभाव पाडायचा असेल, तर सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना पुनरूज्जीवित करणे आवश्यक आहे. आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रित येऊन धोरणे ठरवणे आवश्यक आहे. यानेच काळाची आत्यंतिक आवश्यकता असलेले हिंदूंचे पुनरूत्थान शक्य आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी केले. ते ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या प्रथमदिनी सायंकाळच्या सत्रात ‘हिंदु संघटनात्मक शक्तीला पुनरुज्जीवित करणे आणि हिंदूंचे पुनरुत्थान करणे’ या विषयावर बोलत होते.
सौजन्य Indraprasth Vishwa Samvad Kendra
श्री. होसाबळे पुढे म्हणाले की,
१. हिंदु पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला जागतिक स्तरावर आरंभ झाला आहे. हिंदूंमध्येही नवजागृती होत असून हिंदुत्वाचा योग, आयुर्वेद आदींच्या माध्यमातून जागतिक स्तरावर प्रसार होत आहे. हिंदु धर्मात न जन्मलेल्या लोकांतही हिंदु धर्मजिज्ञासा निर्माण झाली आहे.
२. हिंदु संस्कृतीला विरोध, अपमान आणि विडंबन यांतून जावे लागले. आता जागतिक स्तरावर हिंदु धर्माविषयी स्वीकृती आणि आदर यांत वाढ झाल्याचा काळ आला आहे. धन आणि ज्ञान यांचा उपयोग समाजहितासाठी व्हायला हवा.
३. यासह आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत. यामध्ये ‘हिंदूंचे धर्मांतर, हिंदूंच्या मानवाधिकारांचे हनन, शैक्षणिक क्षेत्रात जोरकसपणे हिंदुत्व मांडता न येणे, प्रसारमाध्यम क्षेत्रात हिंदूंच्या उपस्थितीचा अभाव आणि अनेक देशांमध्ये हिंदूंचा परिणामकारक राजकीय आवाज नसणे’, या आव्हानांचा समावेश आहे.
४. हिंदूंना आणि प्रामुख्याने युवा हिंदु पिढीला धर्माविषयी शिक्षण नाही. युवकांना त्यांच्या भाषेत, सध्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जीवनाचे वास्तविक ध्येय आदींविषयी दिशादर्शन केले पाहिजे.
हिंदूंचे पुनरुत्थान होण्यासाठी संत आणि आध्यात्मिक नेते यांचे मार्गदर्शन आवश्यक ! – श्री. मधु पंडित दास, अध्यक्ष, इस्कॉन बेंगळुरू
आधुनिक जगतामध्ये प्रसारमाध्यमे आणि प्रभावशाली व्यक्ती यांच्याकडून सनातन धर्माविषयी अपप्रचार केला जात असून हिंदु धर्म अन् त्यांच्या चालीरिती यांविषयी संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या युवा पिढीकडून सांस्कृतिक परंपरांचा अंगीकार केला जात नाही. त्यामुळेच आज आपण रामराज्य आणि सनातन धर्म यांमुळे निर्माण झालेल्या गौरवशाली इतिहासापासून पुष्कळ दूर गेलो आहोत. त्यामुळेच हिंदु पुनरुत्थानाची आवश्यकता आहे. त्यामुळेच भारताने गमावलेले सर्वकाही त्याला पुन: प्राप्त होईल. तसेच समाज, राज्य, देश आणि जग यांचे खर्या अर्थाने कल्याण होईल. हिंदूंचे पुनरुत्थान होण्यासाठी संत आणि आध्यात्मिक नेते यांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
‘एकदा मंदिर नेहमीसाठीच मंदिर’, हे सनातनचे तत्त्व अंगीकारा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
इस्लामी कायद्यात म्हटले आहे की, एकदा मशीद झाली की, ती नेहमीसाठीच मशीद रहाते. एखादी भूमी वक्फ बोर्डाने घेतली, तर ती नेहमी वक्फकडेच रहाते. अशाच प्रकारे सनातन धर्माचे तत्त्व आहे की, ‘एकदा मंदिर झाले की, ते नेहमी मंदिरच रहातेे’; परंतु हे दुर्दैव आहे की, आपण या तत्त्वाचा अंगीकार करत नाही. श्रीराममंदिराच्या निकालाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, देवतेच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर तिचा अधिकार हा नेहमीसाठीच अबाधित रहातो. त्यामुळेच या तत्त्वाला वैधानिक समर्थन प्राप्त झाले आहे, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले.
अधिवक्ता जैन त्यांच्या भाषणात वाराणसीतील ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंत दाखवत म्हणाले की, ही भिंत हिंदु मंदिराचे अवशेष आहेत. ज्ञानवापीचे सर्वेक्षण करणार्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या समितीसमवेत मीही होतो. मंदिराच्या अवशेषांचा वापर करून मशीद उभी करण्यात आली, हे स्पष्ट आहे. मशीद ही त्या जागेची मूळ धार्मिक ओळख नाही. जर एखादा मशिदीत जाऊन त्याने तेथे मूर्ती स्थापित केली, तर त्या धार्मिक स्थळाला मंदिर संबोधता येईल का ? याला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे ‘नाही’ ! त्याच प्रकारे जर एखादा मंदिरात प्रवेश करू लागला आणि त्याने तेथे नमाजपठण केले, तर मंदिराची वैशिष्ट्ये नष्ट होतील का ? यालाही एकच उत्तर आहे – ‘नाही’ ! ज्ञानवापीमध्ये दुसरे काही केले गेले नसून आपल्या मंदिराच्या अवशेषांद्वारेच मशीद उभारण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणापासून मूळ भारतीय तत्त्वज्ञान शिकवले, तर अर्धेअधिक आघात दूर होतील ! – अभिजित मजुमदार
‘सीएन्एन् न्यूज १८’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सल्लागार संपादक अभिजित मजुमदार म्हणाले, ‘‘भारत हा जगासाठी माहितीचा सर्वांत शक्तीमान स्रोत ठरू शकतो. आपल्याला शिक्षणक्षेत्रातील त्रुटी सुधारून नवीन शिक्षण नीतीचा लवकरात लवकर अवलंब केला पाहिजे. वसाहतवादी, इस्लामी आणि साम्यवादी यांची घाण अन् असत्य यांनी भरलेली आपली पाठ्यपुस्तके पालटली पाहिजेत. मातृभाषेत शिक्षण दिल्याने शिक्षणाचे सशक्तीकरण होऊ शकेल. प्राथमिक शिक्षणापासून मूळ भारतीय तत्त्वज्ञान शिकवले गेले पाहिजे. यानेच पुढील १-२ पिढ्यांत आपल्या संस्कृतीवर होत असलेले अर्ध्याहून अधिक आघात दूर होतील, कारण हेच सर्वांचे मूळ आहे.’’
अश्लील विषय दाखवणे आणि प्रसृत करणे राष्ट्रविरोधी कृत्य ! – लेखक उदय माहूरकर
बँकॉक (थायलँड) – भारत शासनाचे माजी माहिती आयुक्त, लेखक आणि इतिहासतज्ञ श्री. उदय माहूरकर यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या प्रथमदिनी ‘हिंदु मीडिया कॉन्फरन्स’ला संबोधित करतांना म्हटले की, ‘नेटफ्लिक्स’सारख्या ‘ओटीटी’ माध्यमांतून दाखवण्यात येणार्या कार्यक्रमांतून हिंदु कुटुंबांवर भयावह परिणाम होत आहेत.
हे परिणाम एवढे विघातक आहेत की, ‘वेब सीरिज’ बनवणारे हे लोक हिंदु समाजाची अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब यांनी केलेल्या हानीपेक्षा अधिक हानी करत आहेत. या विरोधात कठोर कायदा करणे अत्यावश्यक आहे. अश्लील विषय दाखवणे आणि प्रसृत करणे, यांना राष्ट्रविरोधी कृत्य संबोधण्याची तरतूद या कायद्यात असणे आवश्यक आहे.