Tax Defaulters : मुरगाव (गोवा) नगरपालिकेने ऐन दिवाळीत थकबाकीदारांच्या दुकानांना ठोकले टाळे !

२० दिवसांत झाली ८४ लाख रुपये वसुली

मुरगाव नगरपालिका

वास्को, २४ नोव्हेंबर (वार्ता.) : मुरगाव नगरपालिकेने ऐन दिवाळीत कर थकवणार्‍या दुकानांना टाळे ठोकण्याची मोहीम आरंभली. नगरपालिकेच्या या उपक्रमामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून थकबाकीदार थकित रक्कम भरण्यासाठी अजूनही रांगेत उभे रहात आहेत. मोहिमेला प्रारंभ केल्यावर २० दिवसांच्या कालावधीत पालिकेची ८४ लाख ६४ सहस्र रुपयांची थकित रकमेची वसुली झालेली आहे.

थकित करदात्यांच्या दुकानांना टाळे लावतांना मुरगाव पालिकेचे कर्मचारी

मोहिमेविषयी अधिक माहिती देतांना मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर म्हणाले, ‘‘आस्थापनांना टाळे ठोकण्यास प्रारंभ केल्यानंतरच थकबाकीदारांनी थकित रक्कम भरण्यास प्रारंभ केला. शहरातील मोठी आस्थापनेही पालिकेची थकबाकी भरत नव्हती. मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याची माहिती असूनही ही स्थिती होती. पालिकेने थकबाकी वसुलीसाठी अनेक आस्थापनांना मिळून सुमारे २०० नोटिसा पाठवल्या होत्या; मात्र एकानेही याला दाद दिली नव्हती. पालिकेने टाळे ठोकण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत शहरातील सुमारे २० ते २५ मोठी आस्थापने आणि प्रदर्शन स्थळे (शोरूम) यांना टाळे ठोकले. यामुळे थकबाकीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर थकित वसुली होऊ लागली. एका थकबाकीदाराने एका दिवसात पालिकेचे १० लाख रुपये भरले. आता पालिका पाठवत असलेल्या नोटिसीला त्वरित उत्तर देऊन आस्थापने थकबाकी भरू लागले आहेत.’’

संपादकीय भूमिका

दंडाचीच भाषा समजणारे अप्रामाणिक दुकानदार आणि आस्थापने !