Threat To Journalist : पत्रकाराला धमकी दिल्याच्या प्रकरणी कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार नोंद झाला पहिला गुन्हा
कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात येणार्या गरोदर मातांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांविषयीचे वृत्त प्रसिद्ध केल्याच्या रागातून ‘दैनिक नवराष्ट्र’ आणि ‘सिंधुदुर्ग २४ तास’ न्यूज चॅनल’ या डिजिटल प्रसिद्धीमाध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४, तसेच भा.दं.वि. कलम ५०४, ५०६ अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद होण्याची ही पहिलीच घटना आहे.
(सौजन्य : Sindhudurg 24 taas)
२२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ‘सिंधुदुर्ग २४ तास’ या डिजिटल माध्यमात ‘कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी वणवण करावी लागते’, अशा मथळ्याखाली पत्रकार भगवान लोके यांनी बातमी प्रसारित केली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री डॉ. अर्पिता आचरेकर यांनी लोके यांना भ्रमणभाष करून विचारणा केली. या वेळी झालेल्या संभाषणात लोके यांनी ‘आपण बाह्यरुग्ण विभागात (ओपीडीला) नव्हता’, असे सांगितले. या वेळी डॉ. आचरेकर यांनी ‘मी ओपीडी केली. त्याची सूची (लिस्ट) आहे. मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन’, असे सांगितले, तसेच ‘खोटी बातमी देतोस काय ? तुला चपलेने हाणीन. माझ्या वाटेला जाऊ नकोस’, अशा प्रकारे धमकी दिली. डॉ. आचरेकर यांनी पोलीस ठाण्यात लोके यांच्या विरोधात अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हाही नोंद केला.
पत्रकार भगवान लोके यांनी दिलेली बातमी –🛑 कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी करावी लागते वणवण 🛑 स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता आचरेकर यांची नेमणूक असतानाही रुग्ण सेवेवर परिणाम ; लोकप्रतिनिधी , राजकीय नेते लक्ष देतील का ? ✒ कणकवली दि.२२ नोव्हेंबर(भगवान लोके) 🗨 सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा |
यानंतर भगवान सुरेश लोके यांनी ‘डॉ. आचरेकर यांच्यापासून जीवितास धोका पोचेल. त्यांची रुग्ण आणि रुग्णालयातील नागरिक यांच्याशी असलेल्या वर्तणुकीविषयी पुष्कळ काही ऐकायला मिळाले आहे’, अशा आशयाची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.