दत्तात्रय वारेगुरुजी यांना यंदाचा ‘सावली’ पुरस्कार घोषित ! – किशोर देशपांडे, सावली
कोल्हापूर, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – कोल्हापूरमधील ‘सावली केअर सेंटर’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ध्येयवेड्या पद्धतीने काम करणार्या सेवाव्रतीला देण्यात येणारा २०२३ चा ‘सावली’ पुरस्कार शिक्षणक्षेत्रात चमत्कार घडवणार्या श्री. दत्तात्रय वारेगुरुजींना देण्याचा निर्णय सावलीच्या निवड समितीने घेतला आहे, अशी माहिती ‘सावली’चे प्रमुख श्री. किशोर देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ५१ सहस्र रुपये रोख, श्री तुकाराम गाथा, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
१. वारेगुरुजी पुणे जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. वाबळेवाडीच्या शाळेची दूरवस्था होती. गुरुजींनी ग्रामस्थ, राज्यशासन, समाज यांच्या साहाय्याने शाळेचे रूप पालटले आणि शैक्षणिक दर्जाही अव्वल केला. प्रारंभी केवळ ३२ विद्यार्थी असलेल्या या शाळेत आज ७५० विद्यार्थी आहेत. या शाळेला पर्यावरणपूरक इमारती, नेत्रसुखद परिसर, वैशिष्ट्यपूर्ण बैठकव्यवस्था, अशा अनेक कारणांनी आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला हा मान मिळणारी ती पहिली शाळा ठरली आहे. आता या शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रतीक्षासूची लागली आहे.
२. गुरुजींचे काम न पहावले गेल्याने राजकीय आरोपांमुळे त्यांचे स्थानांतर दुर्गम अशा जालंदरवाडी येथे करण्यात आले. २ गळक्या वर्गखोल्या आणि केवळ ३ पटसंख्या असलेल्या शाळेचे रूप त्यांनी अवघ्या एका वर्षामध्ये पालटून टाकले. आज जालंदर शाळेमध्ये ११० पटसंख्या झाली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
३. यथावकाश त्यांच्यावरील सर्व आरोपांमधून त्यांची मुक्तता झाली. तरी अशा वारेगुरुजी यांना २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता ‘सावली’च्या पीरवाडी, राधानगरी रोड येथे असलेल्या इमारतीत ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’च्या सचिव सौ. शुभांगी गावडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.