पुणे रेल्वेस्थानकावर गाडीच्या जुन्या डब्यांमध्ये प्रवाशांसाठी उपाहारगृहाची अनोखी सुविधा चालू !
पुणे – रेल्वेने गाडीच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह चालू करण्याची अभिनव योजना राबवली आहे. पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्याचे रूपांतर करून उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह २२ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने वर्ष २०२० पासून ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’ ही नवी संकल्पना राबवण्यास प्रारंभ केला.
देशात अशा स्वरूपाचे पहिले उपाहारगृह पश्चिम बंगालमधील असनसोल स्थानकावर उभे राहिले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मागील वर्षी डिसेंबरमध्ये चिंचवड स्थानकावर हा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर पुणे स्थानकावर हे उपाहारगृह आता चालू झाले आहे. आगामी काळात आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांवरही अशा स्वरूपाचे उपाहारगृह चालू होणार आहे. उपाहारगृह २४ घंटे खुले असणार.