टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही ! – धीरज घाटे, भाजप, पुणे शहराध्यक्ष
टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाच्या विरोधात पुणे येथील भाजप कार्यकर्ते आक्रमक !
पुणे – नुकतीच पुणे येथे टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पत्र देत धार्मिक तेढ निर्माण करणार्यांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना कारवाई करण्याचे लक्षात येत नाही का ? – संपादक) पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा; अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत, अशी चेतावणी भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे. ‘टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही’, असे म्हणत टिपू सुलतानच्या विरोधात पुण्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
भाजपच्या शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर, महेश पुंडे यांचा समावेश होता.
धीरज घाटे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली, ज्याने अनेक लोकांचे बळजोरीने धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध, विकृत असलेल्या टिपू सुलतानची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत.
२. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी काही जणांकडून जाणीवपूर्वक अशी कृत्ये केली जात असल्याचे दिसते. केवळ धर्म वेगळा होता म्हणून ज्याने येथील नागरिकांवर अत्याचार केले. त्याच्या उदात्तीकरणाचा प्रकार पुणे शहर भाजप कधीच खपवून घेणार नाही. आपण या संपूर्ण प्रकाराचे अन्वेषण करावे आणि यामागे नक्की कोण लोक आहेत ? याचा शोध घ्यावा. पुण्यातील शांतता बिघडेल, अशा गोष्टींना अजिबात थारा दिला जाऊ नये. पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करावा.
३. आपण या प्रकरणात लक्ष घालून संबंधित कनिष्ठ अधिकार्यांना आवश्यक आदेश द्यावेत.
संपादकीय भूमिका :आज क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करणारे उद्या त्याच्याप्रमाणे वागू लागल्यास आश्चर्य वाटू नये ! |