‘विविध ठिकाणी ॐ उमटणे आणि दैवी कण येणे’, या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी बळ देऊन गुरुसेवा निर्विघ्नपणे पार पाडून घेणे
‘हे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), वर्ष २००० मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार माझ्या साधनेला आरंभ झाला. प्रथमतः गुरुदेवांच्या कृपेमुळे सत्संग घेणे ही सेवा मिळाली. अगदी पहिल्यापासूनच साधकांच्या सहवासात मला पुष्कळ आनंद मिळतो आणि उत्साह जाणवतो. माझ्या आई-वडिलांच्या निधनानंतर साधकांच्या प्रेमामुळे मला त्यांची उणीव कधी भासली नाही. कित्येक वयस्कर साधक मला त्यांच्या लेकीप्रमाणेच मानतात. मला प्रेम देतात. खरे तर केवळ साधकांच्या प्रेमामुळेच मी जिवंत आहे. पू. (सौ.) मनीषाताई (सनातन संस्थेच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक) या माझी आध्यात्मिक आई, आध्यात्मिक बहीण, आध्यात्मिक सखी, अशा सगळ्या भूमिका निभावतात. त्यांची माझ्यावरील अपार प्रीती आणि त्यांनी वेळोवेळी मला दिलेला आधार यांमुळेच मी साधना करू शकत आहे. या साधनाप्रवासात गुरुदेवांनी मला आतापर्यंत अनेक अनुभूती दिल्या. नुकतीच त्यांच्या कृपेची आणि ‘ते माझ्यासमवेतच आहेत’, याची मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. २६.६.२०२१ या दिवसापासून विविध खाद्यपदार्थांवर आणि वस्तूंवर ॐ उमटणे चालू होणे
२६.६.२०२१ या दिवशी मी पोळ्या लाटत असतांना पहिल्यांदा पोळीवर ॐ उमटलेला दिसला. याविषयीच्या इतरांच्या अनुभूती मी वाचल्या आणि ऐकल्या होत्या; पण ‘माझ्याबाबतीतही असे काही घडेल’, असा माझा विचारच झाला नव्हता. त्यानंतर प्रतिदिन, म्हणजे आजपर्यंत (२९.७.२०२३) नियमितपणे प्रत्येक पोळी, भाकरी, लाडू, कणिक यांच्यावर ॐ उमटत आहेत. कधी चहाच्या कपातील तळामध्ये, कधी बशीत, कधी कढईत असे अनेकदा ॐ उमटले आहेत.
२. ॐ च्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत असल्याने अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकणे
अशा प्रकारे ॐ उमटायला आरंभ झाल्यावर घरात मोठा प्रसंग झाला. माझ्या सेवा आणि साधना करण्यावरून माझे नातेवाईक मला अतिशय खालच्या स्तराला जाऊन जवळजवळ पाऊण घंटा बोलत होते. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने मी ते सगळे शांतपणे सहन करू शकले. ‘ॐ च्या माध्यमातून गुरुदेव सतत माझ्या समवेत असल्याने अशा अचानक उद्भवलेल्या प्रसंगांना मी सामोरे जाऊ शकले’, असे मला जाणवले.
३. प्रसंग घडल्यावर दुसर्या दिवशी उजव्या हातावर आणि पायावर विविध रंगांचे पुष्कळ दैवी कण आढळणे
घरात प्रसंग घडला असला, तरी गुरुपौर्णिमेला आठच दिवस असल्याने मला सर्वच सेवा स्थिर राहून शांतपणे करायच्या होत्या. त्यासाठी गुरुकृपा म्हणून हा प्रसंग घडल्यावर दुसर्याच दिवशी सकाळी माझ्या उजव्या हातावर आणि पायावर विविध रंगांचे पुष्कळ दैवी कण आले होते.
ॐ आणि दैवी कण यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी मला बळ देऊन गुरुसेवा निर्विघ्नपणे पार पाडून घेतली, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– एक साधिका (२९.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |