लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !
लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांचा आज कार्तिक शुक्ल त्रयोदशी (२५ नोव्हेंबर २०२३) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी ‘साधकांनी ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना चांगली करून स्वतःला पालटण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत !’ याविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
पू. (श्रीमती) माया गोखले यांना ७९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रत्येक साधकावर अपार प्रीती आणि अनंत कृपा असणे
‘प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) आपल्या सर्वांवर अपार प्रीती आणि कृपा आहे’, हे प्रत्येक साधकाने अनुभवलेलेच आहे. ‘सर्व साधकांनी साधना, सेवा, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे कठोर प्रयत्न करून याच जन्मात मोक्ष प्राप्त करून घ्यावा’, असे त्यांना वाटते. यासाठी गुरुमाऊली आपल्यावर एवढी प्रीती आणि कृपा करतात. या सुवर्णसंधीचा लाभ सर्व साधकांनी करून घ्यावा. गुरुमाऊली केवळ साधकांवर नव्हे, तर जगातील सर्व भक्त, निर्जीव वस्तू आणि सर्व प्राणीमात्र यांच्यावर कृपेचा वर्षाव करतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आनंद देण्यासाठी त्यांना अपेक्षित ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना करून चांगले गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करा !
प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) ऋण इतके आहे की, ‘साधकांनी स्वत:च्या अंगाच्या कातड्याचे (त्वचेचे) जोडे केले, तरी फिटणार नाही. मग काय करायचे?’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आवडेल’, अशी कृती करायची. त्यांनी सांगितलेले मनापासून केले, तर त्यांना आनंद होतो. साधकांनी २४ घंटे गुरुदेवांना अपेक्षित अशी ‘व्यष्टी’ आणि ‘समष्टी’ साधना करायची. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रिया राबवून चांगले गुण आपल्या अंगी आणायचे. साधकांनी चांगले गुण अंगी आणण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना आनंद होतो आणि त्यांचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होतो.
३. एखादा साधक कधीतरी चुकीचे वागल्यास त्याला त्याबद्दल प्रेमाने साहाय्य म्हणून सांगायचे !
जे आपल्याला कळत नाही, ते आपल्यापेक्षा लहान असले, तरी सहसाधकांना लगेच विचारायचे आणि त्याप्रमाणे कृती करायची. प्रत्येक साधकातील गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) रूप आठवून, मग तो घरातला असो कि बाहेरचा असो, तो सांगेल तसे वागायचे. त्यात न्यूनपणा मानायचा नाही. एखादा साधक कधीतरी चुकीचे वागला, तर त्याला प्रेमाने साहाय्य म्हणून सांगायचे; म्हणजे पुढच्या वेळी त्याच्याकडून तशी चूक होणार नाही.
४. ‘आपल्याला मिळालेली प्रत्येक गोष्ट ईश्वरानेच आपल्याला दिली आहे’, असे समजून रहावे !
आपल्याकडील प्रत्येक गोष्ट ईश्वरानेच आपल्याला दिली आहे, मग आपण त्याला काय देणार? ईश्वराचेच ईश्वराला कसे द्यायचे? त्याच्यावर ईश्वराचाच अधिकार आहे. मग आपण त्याला काय देणार ? साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने ठरवायचे, ‘‘गुरुदेवांना आवडेल असे वागून आणि ‘व्यष्टी’ अन् ‘समष्टी’ साधना चांगली करून स्वतःला पालटण्यासाठी जोमाने प्रयत्न करीन. मग परात्पर गुरुदेवांना पुष्कळ आनंद होईल.’’
हे श्रीकृष्णा, ‘आपल्या अपार कृपेमुळे आम्हा सर्व साधक जिवांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच्या ब्रह्मोत्सवाचा आनंद लुटण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही सर्व संत अन् साधक अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
हे गुरुदेवा, ‘माझ्या बालबुद्धीप्रमाणे चार शब्द तुमच्याच प्रेरणेने लिहिले आहेत. काही चुकले असेल, तर क्षमा करा. तुमच्या कृपेचा ओघ सदैव राहू दे.’
आपल्या चरणांची धूळ,
पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे), लांजा, रत्नागिरी. (१.६.२०२३)