विरोधी गुणधर्माचे असूनही शरिरात गुण्यागोविंदाने राहणारे वात, पित्त आणि कफ
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५७
‘तुम्ही कधी भर दुपारी नदीवर किंवा पोहण्याच्या तलावात (स्वीमिंग पूलमध्ये) पोहायला गेला आहात का ? किंवा जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) केली आहे का ? किती सुखद अनुभव असतो तो ! दुपारच्या वेळेचा तळपणारा सूर्य असला, तरी पाण्याच्या शीतलतेने आणि वार्याच्या सुखद स्पर्शाने मनाला आल्हाददायक वाटत असते. पाणी थंड असले, तरी सूर्याच्या उष्णतेमुळे त्या थंडीचा त्रास होत नाही. कडक सूर्य आणि थंड पाणी या दोघांच्या सहअस्तित्त्वामुळे वाराही फार गरम किंवा फार थंड भासत नाही.
सूर्य, पाणी आणि वारा यांच्या ‘समयोगा’मुळे, म्हणजेच ‘संतुलना’मुळे मनाला ‘आल्हाद’ मिळतो. सूर्य, पाणी आणि वारा यांच्यातील काही गुणधर्म एकमेकांच्या परस्पर विरोधी असले (उदा. सूर्य गरम, तर पाणी आणि वारा थंड), तरी त्यांचा मनाला त्रास होत नाही. (‘गुणधर्म’, असा मोठा शब्द म्हणण्यापेक्षा यापुढे आपण ‘गुण’ असेच म्हणूया ! प्रत्यक्षातही आयुर्वेदात ‘गुणधर्म’ या शब्दाच्या जागी ‘गुण’ असाच शब्द वापरला आहे.)
शरिरातील वात आणि कफ ‘शीत (थंड)’ गुणाचे, तर पित्त उष्ण (गरम) गुणाचे आहे. ‘एकमेकांच्या विरोधी गुणांचे हे वात, पित्त आणि कफ निरोगी शरिरात गुण्यागोविंदाने राहतात’, हीच तर भगवंताची लीला आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२३)
♦ या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या ♦