Save Forts : खर्डा (अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक गडासमोर प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे होणारे बांधकाम थांबवले !

  • प्रशासनाकडून चालू होते बांधकाम !

  • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि शिवप्रेमी अन् ग्रामस्थ यांच्या एकत्रित विरोधाचा परिणाम !

अहिल्यानगर : हिंदवी स्वराज्यातील ऐतिहासिक शेवटची लढाई खर्डा येथील शिवपट्टण उपाख्य खर्ड्याचा भुईकोट (भूमीवर बांधलेला गड) येथे लढली गेली. याच खर्डा गडाच्या समोर प्रशासनाच्या वतीने जनसुविधा केंद्राच्या नावाखाली प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे बांधकाम चालू करण्यात आले होते. त्यामुळे गडाचा पुढील भाग झाकला जात होता. याला विरोध म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, शिवप्रेमी, ग्रामस्थ यांच्या वतीने तीव्र विरोध दर्शवण्यात आला. याची नोंद जामखेड तालुका दंडाधिकारी, तहसीलदार आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पहाणी करून ‘हे बांधकाम गडाच्या दर्शनी भागात करणार नाही. त्यासाठी दुसरी जागा उपलब्ध करून तेथे ही हे बांधकाम करू’, असे आश्‍वासन दिले. धारकरी, शिवप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या भावना लक्षात घेऊन चालू असलेले काम तातडीने थांबवण्यात आले.

गडाचे प्रवेशद्वार
गडाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी चर्चा करतांना प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ

या वेळी तहसीलदार योगेश चन्द्रे, पुरातत्व विभागाचे अधिकारी विजय धुमाळ, हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडूराजे भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, राष्ट्रवादी जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, मनसेचे प्रमुख प्रदीप टाफरे, गणेश जोशी आदी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

गड-दुर्गांचे संवर्धन आणि रक्षण करणे तर दूरच, उलट त्यासमोर प्रसाधनगृह बांधणे, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !