दिंडीसाठी ‘प्लॉट’ वाटपाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल ! – उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २३ नोव्हेंबर (वार्ता.) – एका दिंडीला केवळ ३ दिवस ‘प्लॉट’ (जागा) देणे अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करून त्यांची नोंद करण्यात यावी आणि भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे, असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्या वेळी त्यांनी प्लॉट वाटपाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
येथे वर्षभरात चार वार्यांना भाविक ६५ एकर मधील प्लॉट घेऊन ३ ते ५ दिवस नित्यनेम करण्यासाठी मुक्कामी रहातात. तेथे ते भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम करतात. पूर्वी नदीच्या वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम व्हायचे; परंतु स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना ६५ एकर मधील प्लॉटमध्ये रहाण्यासाठी जागा खुली केली आहे, असे न्यायालयात सांगण्यात आले. ६५ एकर मधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला ३ मासातून एकदा प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. सध्या प्रत्येक वारीला, प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणार्या भविकांना मंडप सापडणे कठीण होते.