Banish ‘Sunburn’ Festival Totally From Goa ! : ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !
हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या उपजिल्हाधिकार्यांकडे मागणी
पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) : गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न २०२३’चे आयोजन होत असल्याची घोषणा ‘सनबर्न’च्या आयोजकांनी नुकतीच केली आहे. यासाठी येणार्या आंतरराष्ट्रीय कलाकारांची नावेही घोषित करण्यात आली आहेत. ‘सनबर्न’मुळे गोव्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. विकृतीला प्रोत्साहन देणारे आणि युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून त्यांना नासवणारे ‘सनबर्न’ आणि अन्य ‘ईडीएम्’ (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) यांसारखे कार्यक्रम गोव्यातून कायमचे हद्दपार करावेत आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती सँड्रा डिसोझा यांच्याकडे २३ नोव्हेंबर या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘भारत माता की जय संघटने’चे श्री. रामदास सावईवेरेकर, ‘हिंदु जनजागृती समिती’चे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, श्री. सुशांत दळवी, धर्मप्रेमी श्री. दिलीप शेट्ये, श्री. अशोक हळदणकर आणि सौ. प्रतिभा हळदणकर यांचा समावेश होता.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वर्ष २००९ मध्ये कांदोळी समुद्रकिनारी झालेल्या ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये नेहा बहुगुणा या २३ वर्षीय युवतीचा, वर्ष २०१४ मध्ये कांदोळी समुद्रकिनारी झालेल्या ‘सुपरसोनिक’ या अशाच प्रकारच्या महोत्सवात मुंबईस्थित ‘फॅशन डिझायनर’ ईशा मंत्री या युवतीचा, तसेच ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्ये अन्य काही युवकांचा यापूर्वी मृत्यू झालेला आहे. अमली पदार्थाच्या अतीसेवनाने हे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. समाजस्वास्थ्याला हानीकारक असलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन देवभूमी गोव्यात होत आहे.
‘सनबर्न’सारखे ‘ईडीएम्’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे. युवा पिढीला अमली पदार्थांच्या आहारी नेणार्या आणि व्यसनाधीन बनवणार्या ‘ईडीएम्’ आणि ‘सनबर्न’ यांसारख्या महोत्सवांना गोव्यात अनुमती देऊ नये.