गुप्तचर यंत्रणांकडून भारतातील ‘हमास योजने’चा पर्दाफाश !
|
नवी देहली – भारतीय गुप्तचर यंत्रणांना जिहादी आतंकवाद्यांच्या संदर्भात गंभीर माहिती हस्तगत झाली आहे. यमध्ये भारतात ‘हमास योजना’ आखण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतातील बंगाल, झारखंड, बिहार, काश्मीर आणि मध्यप्रदेश, तसेच बांगलादेश येथून काही तरुणांना हमासमध्ये भरती करण्यासाठी पाठवण्यात आले असून अन्यही काही जणांना पाठवण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल असगर रऊफ याचा हात आहे. तोच सर्व तरुणांची भरती करण्यासाठीची सूत्रे हलवत आहे. मसूद अझहरच्या चिथावणीनुसार आतंकवादी भारतात २६/११ च्या स्मृतिदिनी आतंकवादी आक्रमण घडवून आणू शकतात, अशी शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. यावरून गृहमंत्रालयाने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे.
रऊफ तरुणांना पाकव्याप्त काश्मिरात पाठवून तेथे आतंकवादी प्रशिक्षण देत आहे. यानंतर त्यांना हमासकडून इस्त्रायलच्या विरोधात युद्धासाठी पॅलेस्टाईनला पाठवण्यात येत आहे. भारत आणि बांग्लादेश येथून १२ तरुणांना पाकव्याप्त काश्मिरात १० दिवसांचे आतंकवादी प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तान, तुर्कीये मार्गे पॅलेस्टाईनला पाठवण्यात आले. आता आणखी १२ जणांना पाठवण्याची सिद्धता रऊफ करत असल्याचे समजते.