खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळल्याचा दावा !
या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध !
नवी देहली – ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उघळून लावला होता. या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिली होती, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा यांचे दुहेरी नागरिकत्व आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यापूर्वी केला असल्याने आता पन्नूच्या संदर्भातील या माहितीमुळे भारतावर टीका होऊ शकते.
या वृत्तात पुढे म्हटले आहे की,
१. निज्जर हत्येप्रकरणी ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यानंतर अमेरिकेने पन्नू हत्येच्या कटाचा तपशील त्याच्या मित्रराष्ट्रांच्या गटासमोर मांडला होता. त्यामुळे या घटनांतील साम्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांत चिंता निर्माण झाली.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जूनमध्ये झालेल्या अमेरिका दौर्यानंतर अमेरिकेने भारताकडे या प्रकरणी अप्रसन्नता व्यक्त केली. हा कट रचणार्यांना त्यापासून परावृत्त करण्यास भारतास भाग पाडले गेले ? कि अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफ्बीआय) यात हस्तक्षेप करून हा कट हाणून पाडला ?, हे मात्र संबंधित अधिकार्यांनी स्पष्ट केले नाही.
आम्ही अमेरिकेच्या आरोपांची गांभीर्याने चौकशी करत आहोत ! – भारत
अमेरिकेच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आम्ही संघटित गुन्हेगार, आतंकवादी आणि इतर लोक यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहोत. भारत अशा प्रकारच्या माहितीकडे गांभीर्याने पहोतो; कारण अशा गोष्टी आमचे सुरक्षेचे हितही धोक्यात आणू शकतात. आम्ही अमेरिकेच्या आरोपांची चौकशी करत आहेत. ही दोन्ही देशांसाठी चिंतेची गोष्ट आहे.
या संदर्भात अमेरिका सरकारचे प्रवक्ते एड्रियन वॉटसन म्हणाले की, भारतीय अधिकार्यांनी या सूत्रावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, भारत अशा धोरणांना प्रोत्साहन देत नाही. भारत सरकार सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई होईल, अशी आशा आहे.
संपादकीय भूमिकाभारताच्या विरोधात प्रतिदिन गरळओक करणार्या पन्नू याला अमेरिका भारताच्या कह्यात का देत नाही ? याविषयी अमेरिकेने जगाला सांगितले पाहिजे ! |