China Mosques : गेल्या ३ वर्षांत चीनमधील निंग्जिया प्रांतात १ सहस्र ३०० मशिदी करण्यात आल्या बंद !

  • अनेक मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडली !

  • मुसलमान देशांचा सोयीस्कर कानाडोळा !

बीजिंग (चीन) – चीन सरकारकडून निंग्जिया आणि गांसु स्वायत्त क्षेत्रांत मशिदींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. वर्ष २०२० पासून, म्हणजे गेल्या ३ वर्षांत निंग्जिया क्षेत्रात चीन सरकारने १ सहस्र ३०० मशिदी बंद केल्या आहेत, अशी माहिती ‘ह्यूमन राईट्स वॉच’ संघटनेने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. ही दोन्ही क्षेत्रे शिनझियांग प्रांतानंतर सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेली क्षेत्रे आहेत. असे असले, तरी एकही मुसलमान देश अथवा ‘इस्लाम सहकार्य संघटना’ (ओ.आय.सी.) यांनी ‘ब्र’ही काढलेला नाही.

‘ह्यूमन राईट्स वॉच’ संस्थेने केलेल्या संशोधनात पुढे सांगण्यात आले आहे की,

१. वर्ष २०१६ मध्ये चीनच्या साम्यवादी शासनाने चीनमधील धर्मांचे चिनीकरण करण्याचे आवाहन केल्यावर तेथील मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ लागले.

२. एप्रिल २०१८ मध्ये सरकारने आदेश दिला की, इस्लामी धर्मस्थळांची उभारणी आणि ढाचा यांवर सरकारी अधिकार्‍यांचे नियंत्रण असावे.

३. निंग्जिया क्षेत्रातील २ गावांमधील मशिदींच्या ‘सॅटेलाईट’ छायाचित्रांचे विश्‍लेषण करण्यात आले. तेव्हा लक्षात आले की, वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत ७ मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडण्यात आली आहेत.

४. झोंगवेई शहराच्या अधिकार्‍यांनी वर्ष २०१९ मध्ये सांगितले होते की, २१४ मशिदी पालटण्यात आल्या, तसेच ५८ मशिदी पाडण्यात आल्या आणि अनधिकृत ३७ मशिदी बंद करण्यात आल्या.

५. इंग्लंड येथील मॅनचेस्टर विश्‍वविद्यालयाचे डेव्हिड स्ट्रप आणि प्लायमाऊथ विश्‍वविद्यालयाच्या प्रा. हन्ना थेकर यांनी हे संशोधन केले आहे.

संपादकीय भूमिका

भाजपच्या तत्कालीन नेत्या नूपुर शर्मा यांनी इस्लामचा कथित अवमान केल्यावरून एकजात सर्व मुसलमान देशांनी भारत सरकारलाच दोषी ठरवले. तेच देश  इस्लामला नष्ट करू पहाणार्‍या चीनच्या विरोधात ‘ब्र’ही काढत नाहीत, याला त्यांचे कथित इस्लामप्रेम म्हणायचे, दुटप्पीपणा म्हणायचा कि भारतद्वेष ?