देवदिवाळी
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देवदिवाळी हा सण साजरा केला जातो. देवदिवाळी ही मुख्यत्वे कोकणप्रांतात आणि खानदेशात साजरी केली जाते. आपले कुलस्वामी आणि कुलस्वामिनी, तसेच इष्टदेव-देवता यांच्या खेरीज ज्या देवदेवता आहेत, त्यात स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता, महापुरुष, वेतोबा इत्यादी आणि आपल्या गावातील इतर महत्त्वपूर्ण अशा मुख्य उपदेव-देवतांचे या देवदिवाळीच्या निमित्ताने स्मरण करून नैवेद्यरूपाने त्यांना मानाचा भाग पोचवण्याचा महत्त्वाचा विधी या दिवशी केला जातो. घरातील गावातील आणि घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या अशा सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदरसत्कार केला जातो. ‘या सर्व देवता संतुष्ट झाल्यावर त्यांच्याकडून होणार्या कृपाछत्रामुळे आपल्या घरावर दुष्ट शक्तींची छाया पडत नाही’, असा दृढ समज आहे.