Goa Govt : सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडेच

आलेक्स सिक्वेरा यांना पर्यावरण, कायदा आणि न्याय अन् विधीमंडळ व्यवहार खाते

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) : नव्याने मंत्रीपदाची धुरा सांभाळणारे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना पर्यावरण, कॅप्टन ऑफ पोर्ट्स, कायदा आणि न्याय, तसेच विधीमंडळ व्यवहार ही खाती मिळाली आहेत, तर सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत:कडे ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रीमंडळातून नीलेश काब्राल यांना वगळल्यानंतर त्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ८ आमदरांपैकी एक असलेले आलेक्स सिक्वेरा यांची १९ नोव्हेंबर या दिवशी मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आमदार आलेक्स सिक्वेरा यांना कोणती खाती मिळणार ? यासंबंधी सर्वांमध्ये उत्सुकता होती.

बांधकाम कर्मचारी भरती रहित होणार नाही ! – मुख्यमंत्री

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी भरती रहित होणार नाही आणि ती रहित करण्याचे कारणही नाही. ही प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ‘माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या कारकिर्दीत अभियंता पदासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती झाली. ही नोकरभरती रहित करणार का ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम खाते मी स्वत:कडे ठेवावे, अशी अनेकांची इच्छा आहे. याविषयी योग्य निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.’’

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणार ! – नवनिर्वाचित मंत्री आलेक्स सिक्वेरा

मुख्यमंत्र्यांनी मला दिलेल्या खात्यांचा पदभार सांभाळतांना कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करीन, अशी ग्वाही नवनिर्वाचित मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या मंत्रीमंडळातील निम्म्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात सहभाग

आमदार आलेक्स सिक्वेरा यांची भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. मागील काँग्रेसच्या मंत्रीमंडळातील निम्म्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात सहभाग आहे. राज्यात वर्ष २००७ ते २०१२ या कालावधीत विद्यमान आमदार दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, मगोपचे सुदिन ढवळीकर, कृषीमंत्री रवि नाईक, मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसच्या कारकीर्दीत मंत्रीपद भूषवले आहे आणि हे सर्व जण आता भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषवत आहेत.