समाजातील सर्व स्तरांवरील लोकांना लाभदायक ठरलेले हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ !
‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. ‘दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाता यावे आणि आपत्काळात श्रद्धावान हिंदू अन् संत यांना साहाय्य करता यावे’, यासाठी या प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात येते. या वर्गांमध्ये ‘वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर आधार कसा द्यावा ?’, हे शिकवण्यात येते. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गात शिकवल्याप्रमाणे समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रथमोपचार वर्गात येणार्या समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांनी काही वास्तविक प्रसंगांत रुग्णांवर प्रथमोपचार केल्यावर त्या रुग्णांना लाभ झाला, तसेच देवाचे साहाय्य घेऊन प्रथमोपचार केल्याने कार्यकर्ते आणि समाजातील लोक यांच्यात अनेक गुणांचे संवर्धनही झाले. या संदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
संकलक : डॉ. (सौ.) साधना जरळी, समन्वयक, प्रथमोपचार प्रशिक्षण, हिंदु जनजागृती समिती.
१. सौ. विनया जोशी, भुसावळ, जळगाव.
१ अ. गावातील एका गृहस्थाने पत्नीला त्रास झाल्यावर साहाय्य मागणे आणि तिच्यावर प्रथमोपचार करण्याची संधी मिळणे : ‘मी नांद्रा (जिल्हा जळगाव) येथे रहात होते. तिथे रहाणारे एक गृहस्थ साहाय्यासाठी माझ्याकडे आले. ते पुष्कळ घाबरलेल्या स्थितीत होते. त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या पत्नीला काहीतरी झाले आहे. तुम्ही लवकर चला.’’ गावात तशी वैद्यकीय सुविधा नसल्याने मी लगेच त्या ताईला बघायला गेले. ताई ७ मासांची गर्भवती होती आणि तिला झटके येत होते. तेथे लोकांनी पुष्कळ गर्दी केली होती. काही महिलांनी ताईचे हात-पाय धरून ठेवले होते. मी त्या महिलांना सांगितले, ‘‘असे करायला नको.’’
मी लोकांना तेथून जाण्यास सांगून गर्दी न्यून केली आणि ताईला मानसिक आधार दिला. ती पूर्ण शुद्धीत नव्हती; पण प्रतिसाद देत होती. तिच्या यजमानांना सांगून मी तिला गावातील रुग्णालयात नेले. तिथून तिला जळगाव रुग्णालयात पाठवायचे होते. ‘गाडी मिळेपर्यंत तिचे नाडीचे ठोके आणि तिचा प्रतिसाद कसा आहे ? ती शुद्धीवर आहे का ?’, या गोष्टी मी पडताळत होते. गाडीची व्यवस्था झाल्यावर मी तिला जळगाव रुग्णालयात पाठवले.
१ आ. एका महिलेच्या पायावर दगड पडून तिच्या पायाला सूज येणे आणि त्यावर तिला प्रथमोपचार सांगणे : भुसावळ येथे रहात असतांना मला तेथील एका महिलेचा भ्रमणभाष आला. तिने सांगितले, ‘‘माझ्या पायावर धुणे धुण्याचा दगड पडून अंगठ्याला लागले आहे. अंगठा निळा पडून माझ्या पायाला सूज आली आहे आणि चालत असतांना मला वेदना होत आहेत.’’ तिला सायंकाळी वैद्यकीय साहाय्य मिळणार होते. ‘तोपर्यंत मी काय काळजी घेऊ ?’, असे त्या ताईने मला विचारले. ‘तिच्या पायाच्या अंगठ्याचा अस्थिभंग झालेला असू शकतो’, असे माझ्या लक्षात आले. मी तिला सांगितले, ‘‘तुम्ही चालणे आणि जिना उतरणे’, या कृती करू नका. शक्य असेल, तर पाय थोडा उंच स्थितीत ठेवा आणि एका कापडात बर्फ घेऊन पाय शेका.’’ त्यांनी त्याप्रमाणे केले.
१ आ १. रुग्णालयात गेल्यावर ‘महिलेच्या पायाला अस्थीभंग झाला असून विश्रांती घेतली नसती, तर शस्त्रकर्म करावे लागले असते’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : सायंकाळी रुग्णालयात जाऊन आल्यावर ताईने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘ताई, तुम्ही जे सांगितले, तेच आधुनिक वैद्यांनी मला सांगितले आणि १ मास पाय ‘प्लास्टर’मध्ये ठेवण्यास सांगितले. तुम्ही मला ‘चालू नका’, असे सांगितले; म्हणून मी सायंकाळपर्यंत विश्रांती घेतली. रुग्णालयात जाईपर्यंत माझ्या पायावरची सूज ओसरून वेदनाही न्यून झाल्या होत्या. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्ही विश्रांती घेतली नसती, तर तुमच्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागले असते.’’ तेव्हा ताईला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती आणि माझ्याकडूनही देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
२. सौ. मनीषा भोळे, जळगाव
२ अ. अपघाताच्या प्रसंगात स्थिर राहून प्रसंगावधानतेने कृती करता येणे : ‘एकदा यजमान आणि मी मार्गावरून चारचाकीने जात असतांना मागून येणारी एक दुचाकी आमच्या गाडीवर येऊन धडकली. त्या गाडीवर बसलेले एक दांपत्य आणि त्यांचा ६ – ७ वर्षांचा मुलगा, हे सर्व फूटबॉलसारखे उडाले. आम्ही एकीकडे आमची गाडी थांबवून त्यांच्या जवळ गेलो. त्यांतील महिला गोंधळलेल्या स्थितीत होती. तिचा मुलगा सारखा रडत होता आणि यजमान इकडे-तिकडे धावत होते. ‘काय करू ?’, हे त्यांना कळत नव्हते. देवाच्या कृपेने मी त्या मुलाजवळ जाऊन त्याच्या अंगावरचे कपडे आवश्यक तेवढे बाजूला करून त्याची वैद्यकीय पडताळणी केली. त्या महिलेजवळ येऊन मी तिला मानसिक आधार दिला; परंतु ती महिला डोळे उघडत नव्हती. ती दोन्ही कानांना हात लावून बसली होती. त्या महिलेच्या हाताला खरचटले होते. आम्ही तिच्या यजमानांना सांगितले, ‘‘या ताईला लवकरात लवकर रुग्णालयात न्यायला हवे’’; परंतु ते पुष्कळ गोंधळलेले होते. नंतर इतर व्यक्तींनीच गाडी बोलावून त्या महिलेला रुग्णालयात नेले. त्या महिलेचा भ्रमणभाष आणि इतर साहित्य आम्ही तिच्या यजमानांकडे दिले. या प्रसंगात स्थिर राहून प्रत्यक्ष भगवंतानेच माझ्याकडून या कृती प्रसंगावधानतेने आणि आत्मविश्वासाने करून घेतल्या.
२ आ. स्वयंपाक करतांना पोळल्यानंतर ‘शीतोपचार’ करणे : प्रथमोपचार प्रशिक्षण घेतल्याने मला स्वतःलाही त्याचा लाभ होत आहे. बर्याचदा स्वयंपाक करत असतांना ‘माझ्या हातावर तेल उडणे, नकळत गरम तवा हातात पकडणे, गरम भांड्याचा चटका लागणे’, असे होत असते. त्या वेळी ‘शीतोपचार पद्धत (पाण्याच्या धारेखाली हात धरणे)’ वापरल्याने बराच लाभ होतो आणि हातावर पोळल्याचे डागही रहात नाहीत. ‘शीतोपचार केल्यावर त्वचेची आग होणे बंद होते आणि त्वचा सर्वसामान्य होते’, हे मी देवाच्या कृपेने अनुभवले.’
३. सौ. स्नेहा भोवर, सोलापूर
३ अ. वर्गात शिकवल्याप्रमाणे कृती करून मैत्रिणीच्या जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवून तिला रुग्णालयात नेणार्या सौ. नम्रता दुस्सा ! : ‘सोलापूर जिल्ह्यातील ‘विडी घरकुल’ या ठिकाणी प्रत्येक रविवारी एक घंटा समाजातील लोकांसाठी प्रथमोपचार वर्ग असतो. या वर्गाला सौ. नम्रता दुस्सा आणि सौ. भारती पोगुल या उपस्थित असतात.
एकदा सौ. नम्रता दुस्सा सकाळी स्वयंपाक करत असतांना लक्ष नसल्याने त्यांचे बोट वाटणयंत्रात (‘मिक्सर’मध्ये) जाऊन थोडे कापले गेले आणि रक्तस्राव झाला. त्या वेळी प्रथमोपचार वर्गात शिकवल्याप्रमाणे सौ. भारती पोगुल यांनी सौ. नम्रता यांच्या जखमेवर कापड गुंडाळले आणि त्यांचा हात १० मिनिटे उंचावर ठेवला. त्यामुळे रक्तस्राव थांबला. नंतर सौ. भारती त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्या. अशा प्रकारे प्रथमोपचार वर्गात आल्यामुळे त्यांना या प्रसंगात योग्य कृती करता आल्या.’
४. सौ. वीणा माईणकर, जिल्हा सिंधुदुर्ग
४ अ. पायात गोळा आल्यावर प्रथमोपचार वर्गात सांगितल्याप्रमाणे लगेच कृती करणार्या श्रीमती सरिता प्रभु ! : ‘शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे रहाणार्या श्रीमती सरिता प्रभु ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गाला नियमितपणे उपस्थित असतात. एकदा रात्री अकस्मात् त्यांच्या पायात गोळा आला. तेव्हा त्या घरी एकट्याच होत्या. त्यांच्या पोटरीत असह्य वेदना होत होत्या. तेव्हा त्यांनी गुरुदेवांचा धावा करत प्रथमोपचार वर्गात शिकवल्याप्रमाणे पाय ढोपरातून दुमडून घेतला आणि पावलांची बोटे धरून पाय स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने बरे वाटल्यावर त्यांनी हळूहळू पाय सरळ केला. ‘प्रथमोपचार वर्गातून हे शिकायला मिळाले’, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
४ आ. आईकडून प्रथमोपचार शिकल्याने विद्यार्थ्यावर प्रथमोपचार करून त्याचे प्राण वाचवणार्या उडुपी (कर्नाटक) येथील सौ. श्रद्धा नायक ! : कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सौ. सीमा पै यांची मुलगी सौ. श्रद्धा नायक उडुपी (कर्नाटक) येथे रहाते. ती कुडाळ येथे माहेरी आली होती. तेव्हा पैकाकूंनी त्यांना प्रथमोपचाराच्या काही कृती शिकवल्या होत्या. सौ. नायक या शिक्षिका आहेत. त्या आठवीच्या वर्गात शिकवत असतांना एका मुलाच्या घशात ‘हाजमोला’ची गोळी अडकली. ‘त्याला श्वास घ्यायला अडचण येत असून तो गुदमरत आहे’, अशी सर्व लक्षणे दिसत होती. हे सौ. नायक यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या मुलाच्या छातीवर हात ठेवून त्याला कमरेतून वाकवले आणि पाठीवर ५ वेळा थापट्या मारल्या. तेव्हा ती गोळी त्याच्या घशातून बाहेर पडली आणि त्याला श्वास घेता आला. हा प्रथमोपचार त्यांच्या आईने शिकवल्यामुळे त्यांना तो करता आला आणि एका विद्यार्थ्याचे प्राण वाचले.’
(१५.९.२०२३)