पोलिसांना ठोस उपाययोजना काढण्याचे निर्देश !

भंडारा जिल्ह्यातील आक्षेपार्ह ‘व्हिडिओ’ची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून गंभीर नोंद !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे – भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरी भागामध्ये आणि त्याचसह मोहाडी तालुक्यातील बीड या ठिकाणी महिलांना त्या नाचत असतांना विवस्त्र करणे अन् त्याचसह त्यांच्यावर पैसे उधळणे हा प्रकार घडला. त्याचे ‘व्हिडिओ’ही समोर आलेले आहेत. हा अत्यंत निंदनीय प्रकार असून ती केवळ एक घटना नसून गंभीर गुन्हा असल्याचे मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. या प्रकरणी त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. छेरिंग दोरजे यांच्याशी दूरभाषद्वारे संवाद साधत घटनेची सखोल चौकशी करत पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. (छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांविषयी अशा घटना घडणे लज्जास्पद आहे. – संपादक)

डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले की,

१. कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे, हा गुन्हा मानला गेला पाहिजे. तसेच रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे लोकांची गर्दी जमते आणि स्त्रियांना विवस्त्र करून नोटा उधळल्या जातात, म्हणजे त्यांनी अश्लील हावभाव करत नाचावे.  यामुळे कायद्याचा भंग झालेला आहे.

२. यामध्ये राजकीय नेतेही सापडलेले आहेत. हे अत्यंत निषेधार्ह आणि चीड आणणारे आहे. त्यामुळे यामध्ये कडक कारवाईसह या प्रकारचे नृत्य करणार्‍या ज्या स्त्रिया आहेत, त्यांनी नृत्यांमध्ये विवस्त्र नाचता कामा नये, हे त्यांना बंधनकारक करणे आवश्यक आहे. यामध्ये पोलिसांनी नियमावली सिद्ध करणे आवश्यक आहे.

३. ज्या वेळी डान्सबार विरोधी कायदा झाला, त्याच्यातही अनेक बंधने घालण्यात आली होती. सामान्य लोकांचा सहभाग ज्या कार्यक्रमात असतो, त्या वेळेस अशा पद्धतीने लोकांनी महिलांना बळजोरी करून त्यांचे लैंगिक शोषण करणे किंवा त्यासारखे गुन्हे करणे हे अत्यंत चीड आणणारे आहे. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सामाजिक भान आणि कायद्याची बूज राखली गेली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.

कर्तव्यात कसूर करणार्‍या२ पोलिसांचे निलंबन !

भंडारा – येथील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अश्लील नृत्य करण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कार्यक्रमस्थळी उपस्थित असणारे राकेश सिंग सोलंकी आणि आणि राहुल परतेती या २ पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असूनही अश्लीलतेविरोधात काहीच कृती केली नाही. कार्यक्रमात मुलींच्या शरिरावरील कपडे काढत नग्न अवस्थेत नृत्य सादर करण्यात आले.

अयोग्य दिसूनही ते रोखण्यासाठीकृती न करणारे पोलीस काय कामाचे ?