नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले श्री. रामचंद्र शेळके (वय ६७ वर्षे) यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
परिचय : श्री. रामचंद्र शेळके हे मागील ४० वर्षांपासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. समाजशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय नाट्यविद्यालय, नवी देहली येथून नाट्यशास्त्रातील ‘अभिनय’ या विषयात विशेष प्रावीण्य (Specialization) प्राप्त केले आहे. त्यांनी त्यांच्या या प्रदीर्घ कार्यकाळात नाटक, चित्रपट, ‘टेलिव्हिजन’ या क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, संहितालेखन, कठपुतली आदी विविधांगी कार्य केले आहे. कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या समवेत त्यांनी काम केलेले आहे.
त्यांनी ‘राष्ट्रीय नाट्यविद्यालय, नवी देहली’ आणि ‘थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ’ येथे नाट्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापिठामध्ये त्यांनी नाट्य आणि संगीत यांचा एक नवीन स्वतंत्र विभाग चालू केला.
त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत भारतात, तसेच अनेक देशांमध्ये चित्रपट, नाट्य आणि नाट्य शिबिरांमध्ये महत्त्वाचे कार्य केलेले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यकला अन् लोककला यांचे महोत्सव भरवले अन् परिषदाही घेतल्या. नाट्यातील शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना शासनाचा ‘महात्मा ज्योतिबा फुले – आदर्श शिक्षक’ हा पुरस्कार मिळाला आहे.
१. सात्त्विक अभिनय
‘पात्राच्या अंतरंगातील भावविश्व प्रसंगानुरूप साकार करणे, म्हणजे सात्त्विक अभिनय !
नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी अभिनयाचे प्रमुख चार घटक सांगितले आहेत. त्यापैकी सात्त्विक अभिनय हा महत्त्वाचा घटक आहे.
२. स्थायीभाव
नाट्यशास्त्रकारांनी ‘रसांची निष्पत्ती (उत्पत्ती) ही भावातून होते’, असे सांगितले आहे. सर्व प्रकारच्या भावांमध्ये ‘स्थायीभाव’ प्रधान आहे. नऊ रसांच्या मुळाशी त्या त्या रसाचा स्थायीभाव (मानवी भावना) असतो. नाट्यशास्त्राप्रमाणे ८ रसांचे ८ स्थायीभाव आहेत. रस आणि त्यांचे स्थायीभाव पुढीलप्रमाणे आहेत – शृंगार रस – रती, हास्य रस – हास, करुण रस – शोक, रौद्र रस – क्रोधभाव, वीर रस – उत्साहभाव, भयानक रस – भयभाव, बीभत्स रस – जुगुप्साभाव, अद़्भुत रस – विस्मयभाव ! अभ्यासकांनी पुढे ‘शांतरस’ हा नववा रस जोडला अन् त्याचा स्थायीभाव ‘निर्वेद’ आहे.’
नाट्यशास्त्रामध्ये मानवी मनातील भावनांना ‘भाव’ असे म्हटले आहे, उदा. प्रेम, क्रोध, भय, आश्चर्य इत्यादी.’
(७.३.२०२३)
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना श्री. रामचंद्र शेळके यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !
सप्टेंबर २०२२ वर्षापासून श्री. रामचंद्र शेळके हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागांतर्गत नाट्यातील साधकांचे नाट्यवर्ग घेत आहेत. यामध्ये ते नाट्यातील विविध पैलूंविषयी तात्त्विक आणि प्रायोगिक भागांचे साधकांना प्रशिक्षण देत आहेत. या नाट्यवर्गाच्या कालावधीत साधकांना श्री. शेळके यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या नाट्यशिक्षण वर्गाच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती खाली दिल्या आहेत.
१. सौ. शुभांगी शेळके, (श्री. रामचंद्र शेळके यांच्या पत्नी) एम्.ए. नाट्यशास्त्र अन् लोककला, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
१ अ. ‘कुठल्याही परिस्थितीत मनापासून सेवा करत असल्याने सेवेतून आनंद मिळणे : ‘श्री. शेळके हे कुठल्याही परिस्थितीत मनापासून सेवा करतात. त्यामुळे त्यांना सेवेतून आनंद मिळतो, उदा. एकदा नाट्यवर्ग घेण्याच्या जागेचे नियोजन जागेच्या उपलब्धतेनुसार अनेक वेळा पालटत होते. तेव्हा त्यांनी जागेच्या नियोजनातील पालट स्वीकारले आणि मनापासून अभ्यासवर्ग घेतले.
१ आ. आध्यात्मिक दृष्टीकोनातून शिकवणे : साधारणपणे अभिनयवर्गामध्ये ‘रंगमंचावर अभिनय कसा करावा ?’, हे शिकवले जाते आणि अनेकदा ते वरवरचे असते; पण श्री. शेळके तो विषय सखोल शिकवतात. त्यामुळे त्यांचे वर्ग आपोआपच आध्यात्मिक स्तरावरचे होतात आणि विद्यार्थ्यांना नाट्य सरावात एकाग्रता साध्य करता येते, उदा. ते म्हणतात, ‘‘अभिनय हीसुद्धा स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया आहे. अध्यात्मातही साधक स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला ओळखण्यासह समोरच्यालाही ओळखता आले पाहिजे. माणूस बघितल्यावर त्याला वाचता आले पाहिजे.’’ हे त्यांनी खालील उदाहरणांवरून स्पष्ट केले.
१ आ १. कलाकार संवेदनशील बनल्याने त्याचा स्वतःच्या आणि इतरांच्या प्रकृतींचा अभ्यास होणे : साधनेत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्याने स्वतःच्या अन् इतरांच्या प्रकृतीचा अभ्यास होतो. ते म्हणतात, ‘‘पंचज्ञानेंद्रियांद्वारे जेवढी माहिती ग्रहण करू, तेवढा तो कलाकार कलात्मकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनत जातो. सभोवताली घडणार्या घटनांचा अभ्यास केला, तर जगाकडे बघण्याची एक दृष्टी निर्माण होते. यामध्ये समोरच्याची प्रकृती समजून घेता येते. व्यक्तीची पार्श्वभूमी आणि त्याची प्रकृती ठाऊक असल्याने त्याच्या वागण्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया न येता, त्याच्या वर्तनाचे विश्लेषण करता येते.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी आपल्याला ‘स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेच्या’ माध्यमातून हेच शिकवले आहे.
१ आ २. कलेची निर्मिती ही बुद्धीतून होत नसून अंतःप्रेरणेने होत असणे : अध्यात्मात ‘बुद्धीचा अती आणि अयोग्य वापर करू नये’, असे सांगितले जाते. बुद्धी आली की, ‘खरे-खोटे’ येते. त्याचप्रमाणे कलेतही बुद्धीचा आवश्यक तेवढाच वापर केला जातो. कुठल्याही सुंदर कलेची निर्मिती वा प्रस्तुती ही बुद्धीतून होत नसून अंतःप्रेरणेने (Instinct) होत असते. आदिमानवाच्या काळातही कला होत्या. तेव्हा तो कुठे बुद्धी वापरत होता ? त्याच्या मनातील भाव-भावना त्याने चित्र, गायन, नृत्य यांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या. त्यामुळे ‘मनातील भाव प्रदर्शित करणे’, म्हणजे कलाकाराच्या कलेची अभिव्यक्ती (सादरीकरण) होय.
१ इ. अभ्यासू वृत्ती आणि सहजपणे शिकवण्याचे कौशल्य असणे : श्री. शेळके यांची सखोल अभ्यास करण्याची वृत्ती असल्याने क्लिष्ट विषयही ते सहजपणे आणि सोप्या पद्धतीने शिकवतात. त्यामुळे तो विषय विद्यार्थ्यालाही सहज आकलन होतो. उदा. साधकांना नाट्याच्या तात्त्विक भागामध्ये ‘पाश्चात्त्य रंगभूमी’ हा क्लिष्ट विषय शिकवतांना त्यांनी संक्षिप्त अन् सोप्या पद्धतीने शिकवला. त्यामुळे आम्हाला हा विषय सहज आकलन झाला.
१ ई. कलाक्षेत्रातील मंडळींवर पुरोगामी विचारसरणीचा घट्ट पगडा असतांना श्री. शेळके यांचे शिकवणे आध्यात्मिक दृष्टीकोनातूनच असणे : अलीकडे पुरोगामी विचारसरणीमुळे सर्वच विषयांना ईश्वराच्या अधिष्ठानापासून तोडलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही पुरोगामी दृष्टीकोन वाढीस लागत आहे. श्री. शेळके शिकवतांना ‘कलेचे अधिष्ठान अध्यात्म आहे’, असे प्रथमपासूनच नमूद करतात आणि त्यामुळेच त्यांना अन् विद्यार्थ्यांनाही आध्यात्मिक दृष्टीने शिकता येते, उदा. नाट्यशास्त्राच्या उत्पत्तीच्या पौराणिक कथेविषयी कलाक्षेत्रातील मंडळी साधी वाच्यताही करत नाहीत; पण शेळके ही कथा सांगतातही आणि ‘आपल्याकडे कला ही ईश्वराने निर्माण केली आहे’, हेही सांगतात.
१ उ. ‘सर्व कला या परस्परावलंबी आणि परस्परपूरक आहेत’, असा व्यापक दृृष्टीकोन ठेवून शिकवणे : नाट्यवर्गांत शिकवतांना ‘केवळ नाट्यकलाकार घडावेत’, असा संकुचित विचार न ठेवता ते सर्वच कलांतील कलाकारांना आवश्यक असलेली सूत्रे शिकवतात. त्यामुळे वर्गातील प्रात्यक्षिकेसुद्धा सर्व प्रकारच्या कलाकारांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त आहेत. ‘प्रत्येक कला ही वेगळी नसून सर्व कला या परस्परावलंबी आणि परस्परपूरक आहेत’, असा व्यापक द़ृष्टीकोन ठेवून ते शिकवतात.’
(७.३.२०२३)
(क्रमशः)