‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ हे नामजप करत असतांना साधिकेने केलेले भावजागृतीचे प्रयोग अन् त्या वेळी तिला आलेल्या अनुभूती !
‘मला होत असलेल्या त्रासांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी ‘निर्गुण’ हा जप करायला सांगितला, तसेच पुढे एखाद्या वेळी माझा त्रास वाढल्यावर आधुनिक पशूवैद्य अजय जोशीकाका (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६८ वर्षे) यांनी ‘ॐ’ हा जप करायला सांगितला. जप करतांना देवाने मला सुचवलेले भावजागृतीचे प्रयोग आणि ते करतांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘निर्गुण’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. ‘स्वतः नवजात शिशु आहे’, असा भाव ठेवल्यावर निर्गुण परमेश्वरस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांभाळ करत असल्याची जाणीव होणे : ‘निर्गुण’ हा नामजप करतांना ‘मी एक नवजात शिशु आहे’, असा भाव मी ठेवते. त्या वेळी मला पुढील दृश्य डोळ्यांसमोर दिसते, ‘ज्याला काही कळत नाही, असा तो शिशु निर्गुण ईश्वरालाच हाक मारत आहे, ‘ईश्वरा, तूच माझा सांभाळ कर.’ त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले या बाळाला उचलून घेतात. बाळाला कृतज्ञता व्यक्त करता येत नाही किंवा डोळे उघडून देवाचे दर्शनही घेता येत नाही; पण ‘निर्गुण परमेश्वरस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मांडीवर आपण सुरक्षित आहोत. तेच सर्व सांभाळत आहेत’, असे त्या बाळाला वाटते.’
१ आ. भावजागृतीचे प्रयोग करत असतांना ‘सर्वकाही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या इच्छेने होत आहे’, असे जाणवणे : नामजपाच्या वेळी भावजागृतीचे प्रयोग करत असतांना मला जाणवते, ‘माझ्या हृदयाचे ठोके, माझा श्वासोच्छ्वास इत्यादी सर्वकाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नियंत्रणात आहे. सर्वकाही त्यांच्या इच्छेने होत आहे. मी पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून आहे. तेच माझा सांभाळ करत आहेत आणि जगात आम्हा दोघांविना दुसरे काहीच नाही.’
२. ‘ॐ’ हा नामजप करत असतांना आलेल्या अनुभूती
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे दर्शन होणे, त्यांच्यातूनच अनेक ‘ॐ’कारां’ची आणि त्यांतून नवीन ब्रह्मांडांची निर्मिती होणे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या उपासनेसाठी ‘ॐ’चा जप होत आहे’, असे जाणवणे : ‘ॐ’ हा नामजप करत असतांना मी भावजागृतीचा पुढील प्रयोग करते, ‘ॐ’चा ध्वज असलेल्या सिंहासनावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसलेले आहेत. त्यांच्यातूनच अनेक ‘ॐ’कारां’ची निर्मिती होत आहे. त्या वेळी मला ‘ॐ’काराचा नाद ऐकू येत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना मी प्रदक्षिणा घालत आहे. प्रत्येक ‘ॐ’कारातून एक नवीन ब्रह्मांड निर्माण होत आहे आणि अशा अनंतकोटी ब्रह्मांडांची निर्मिती करून नंतर ते ‘ॐ’कार सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्येच विलीन होत आहेत. क्षणार्धात होणार्या या सर्व प्रक्रियेकडे मी शांतपणे बघत आहे. ‘अशा अनंतकोटी ब्रह्मांडांचे अधिनायक असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या उपासनेसाठी आणि त्यांना हाक मारण्यासाठीच माझा ‘ॐ’कारा’चा जप होत आहे’, असे मला जाणवत आहे.’
२ आ. मला अधिक त्रास होत असतांना भावजागृतीचे असे प्रयोग केल्यावर माझा नामजप आपोआप होतो आणि मला हलकेपणा जाणवतो.
२ इ. मला माझ्या त्रासाचा विसर पडतो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या स्मरणात रहाता येते.
‘विविध देवतांच्या रूपांत दर्शन देऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांची भक्ती वाढवली आणि त्यामुळेच आता ‘निर्गुण’ अन् ‘ॐ’ यांसारखे पुढच्या टप्प्याचे नामजप करतांनाही साधक त्यांच्या स्मरणात राहू शकतात’, असे वाटून माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |