प्रार्थना करून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा वैखरीतून नामजप करत दुचाकी चालवल्यामुळे अपघात होऊनही गुरुकृपेने रक्षण होणे
‘१७ ते २०.११.२०२२ या कालावधीत रामनाथी येथील आश्रमात एक शिबिर झाले. तेव्हा मला पाठेपाठ ३ वेळा अपघात होऊनही गुरुकृपेने माझे रक्षण झाले. मला झालेले अपघात आणि देवाच्या कृपेने माझे झालेले रक्षण यांविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. शिबिराच्या कालावधीत झालेले अपघात
१ अ. आश्रमातून घरी जातांना दुचाकीच्या चाकावर कुत्रा आदळूनही पडण्यापासून वाचणे : ‘१८.११.२०२२ या दिवशी आम्हा शिबिरार्थींना संतांचा सत्संग मिळाला. तो सत्संग संपल्यानंतर रात्री ११.१५ वाजता मी आश्रमातून घरी जायला निघालो. श्री शांतादुर्गा मंदिराच्या आधी १०० मीटरवर अकस्मात् एक लहान कुत्रा माझ्या दुचाकीच्या समोर येऊन दुचाकीच्या पुढील चाकावर आपटून पळाला. तेव्हा मी पडण्यापासून थोडक्यात वाचलो.
१ आ. दुचाकी थांबवतांना ती पडूनही दुखापत न होणे : २०.११.२०२२ या दिवशी मी घरून आश्रमात जायला निघालो. दुचाकी चालू केल्यावर ‘मी शिरस्त्राण (हेल्मेट) घातले नाही’, हे माझ्या लक्षात आले; म्हणून मी लगेच दुचाकी थांबवली. तेव्हा दुचाकी खाली पडली; पण मी उभा राहिल्यामुळे मला दुखापत झाली नाही.
१ इ. दुचाकीवरून घरी जातांना म्हैस दुचाकीवर आपटल्यामुळे दुचाकी खाली पडूनही गुरुकृपेने इजा न होणे : त्याच दिवशी (२०.११.२०२२) रात्री ११.३० वाजता मी दुचाकीवरून आश्रमातून घरी जायला निघालो. मी श्री शांतादुर्गा मंदिराच्या जवळ आल्यावर तिथे लावलेल्या एका चारचाकी गाडीच्या मागून अकस्मात् २ म्हशी धावत समोर आल्या. त्यांपैकी एक म्हैस माझ्या दुचाकीच्या पुढच्या बाजूला आपटल्यामुळे दुचाकी खाली पडली. दुचाकीचा वेग न्यून असल्यामुळे गुरुकृपेने गाडी पडतांना मी उभा राहू शकलो. त्यामुळे मला अजिबात इजा झाली नाही.
२. या तीनही प्रसंगांच्या वेळी गुरुकृपेने माझा वैखरीतून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा नामजप चालू असल्यामुळे माझे रक्षण झाले’, असे मला जाणवले.
३. ‘देवाने साधिकेच्या माध्यमातून प्रार्थना आणि नामजप करायला सांगून काळजी घेतली’, असे जाणवणे
शिबिराच्या पहिल्या दिवशी मी आश्रमातून रात्री उशिरा घरी जायला निघालो, तेव्हा सौ. मीना धुमाळ मुख्य प्रवेशद्वारापाशी उभ्या होत्या. त्यांनी मला सांगितले, ‘‘काका, जातांना प्रार्थना करा आणि हळू जा.’’ त्यामुळे मी निघतांना प्रार्थना करून आणि संथ गतीने गाडी चालवत घरी जात होतो. प्रार्थना केल्यामुळे आणि नामजप चालू असल्यामुळे मी गुरुदेवांच्या कृपेने तिन्ही वेळा मोठा अपघात होण्यापासून वाचलो.’
– श्री. रवींद्र धांडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |