पुणे येथे होणारे मंदिर अधिवेशन मंदिरांच्या संघटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक-महाराष्ट्र मंदिर महासंघ
चिपळूण येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मंदिर विश्वस्त बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला, तसेच वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा आधार आहेत. आज समाजात प्रत्येक घटकाचे संघटन आहे; मात्र मंदिरांसमोरील वाढत्या समस्या, मंदिरांच्या सरकारीकरणामुळे मंदिरांच्या प्रथा-परंपरा यांचे हनन होत असूनही मंदिरांचे संघटन नव्हते. या दृष्टीने मंदिराची सुरक्षा, पावित्र्य रक्षण अन् मंदिरांचे संघटन या उद्देशाने गेले वर्षभर महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दुसरे अधिवेशन येत्या २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पुणे होणार आहे. मंदिर संघटनांच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी तालुक्यातील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत केले.
२० नोव्हेंबर या दिवशी येथील चितळे मंगल कार्यालयात महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाने गेल्या वर्षभरात मंदिरांचे पावित्र रक्षण आणि संघटन यासाठी केलेले प्रयत्न याविषयी माहिती देऊन आपल्या भागात आपण कसे प्रयत्न करू शकतो ? याविषयी चर्चा करण्यात आली, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पुणे येथे होणार्या दुसर्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेची विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली. या बैठकीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.
क्षणचित्रे
अ. ९ विश्वस्तांनी पुणे येथील मंदिर अधिवेशनाला जाण्याची सिद्धता दर्शवली.
आ. ३ देवस्थानांनी देवळाबाहेर लावण्यासाठी वस्त्रसंहितेच्या फलकांची मागणी केली.
इ. मंदिर विश्वस्तांचा परस्पर परिचय व्हावा, संपर्क यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी पुणे येथील अधिवेशनानंतर चिपळूण तालुक्यातील मंदिर विश्वस्तांची बैठक श्री परशुराम मंदिरात घेण्याच्या नियोजनाचे दायित्व ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांनी घेतले.
ई. एक दिवसाचे मंदिर विश्वस्तांचे जिल्ह्यास्तरीय अधिवेशन घेण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली.
उपस्थित मान्यवर
दसपटी येथील श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. मनोहरराव शिंदे; श्री देव धावजी देवस्थान, पेढे-परशुरामचे अध्यक्ष श्री. गजानन भोसले; श्री कामधेनू मंदिर, पेढेचे अध्यक्ष श्री. मुकुंद वारे; कापसाळ येथील श्री सुकाई मंदिराचे श्री. दीपक साळवी; श्री देव जुना कालभैरव देवस्थानचे विश्वस्त श्री. समीर शेट्ये; श्री. देव नवा कालभैरव देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. रवींद्र चितळे; श्री देव मुरलीधर देवस्थानचे अध्यक्ष श्री. शैलेश टाकळे; श्री विंध्यवासिनी देवस्थानचे विश्वस्त श्री. विनय चितळे; आंबडस येथील श्री गरजाई वाघजाई काळकाई देवस्थानचे अध्यक्ष श्री रवींद्र मोरे; धामणवने येथील श्री विठ्ठलाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. नंदकुमार शेंबेकर; अडरे येथील मंदिराचे श्री. जिवाजी कांबळी; खेर्डी येथील सुकाई देवस्थानचे श्री. सुधाकर दाते; आसूर्डे येथील श्री सुकाई देवस्थानचे श्री. प्रकाश खेतले; सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके यांसह २० मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
१. सद्गुरु सत्यवान कदम : मंदिरे ही हिंदु धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला हवेत.
२. ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, विश्वस्त श्री भार्गवराम देवस्थान, परशुराम : धर्म टिकला, तर आपण टिकणार आहोत. धर्म टिकण्यासाठी मंदिरे टिकवली पाहिजेत. नुकतेच नगरमध्ये एका मंदिरात भजन मंडळींवर आक्रमण होऊनही आपण शांत आहोत, धर्मद्रोही मात्र आक्रमक होते. चिपळूण आणि परिसरातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. पुणे येथील मंदिर अधिवेशनात सहभागी होऊया. मंदिरांना संघटित करण्याचा समितीचा हा चांगला उपक्रम आहे. |