‘दुकानांच्या पाट्या मराठीत लावा, अन्यथा ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू !’
मराठीला दुय्यम लेखणार्या दुकानदारांना मनसेची चेतावणी !
मुंबई – ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात. नाहीतर मनसेच्या पद्धतीने दणका देऊ, ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू, अशी चेतावणी देणारे फलक शहरातील चेंबूर येथे लावण्यात आले आहेत.
सौजन्य एबीपी माझा
१. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या ठळकपणे मराठीत लावण्याविषयी शासन आदेश काढला होता. यामध्ये ‘अन्य भाषांमध्ये पाट्या असण्याला आक्षेप नाही; मात्र मातृभाषा मराठीची पाटी ठळक असावी’, असे नमूद करण्यात आले आहे.
२. मुंबईतील काही व्यापार्यांनी मात्र या विरोधात न्यायालयात याचिका केली होती. यावरून सर्वोच्च न्यायालयाने ‘न्यायालयात व्यय करण्यापेक्षा दुकानाची पाटी मराठीत करा’, या शब्दांत याचिकाकर्त्या दुकानदारांची कानउघाडणी करून मराठी पाटी लावण्यासाठीचा २ मासांनी कालावधी वाढवून दिला होता. हा कालावधी २५ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे यानंतरही मराठी भाषेत पाट्या न लावणार्या दुकानदारांना मनसेच्या पद्धतीने चेतावणी दिली आहे.
याविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रात असाल, तर मराठीत आणि अन्य राज्यांत असाल, तर तेथील भाषेत पाट्या असणे. यामध्ये स्थानिक भाषेचा सन्मान आहे. यामध्ये विरोध करण्यासारखे काय आहे ? तुम्ही जर व्यापारासाठी महाराष्ट्रात येता, तर येथील भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे’, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.