(म्हणे) ‘एकटा पुरुष महिलेवर बलात्कार करू शकत नाही, त्यासाठी ३-४ लोक लागतात !’ – काँग्रेसचे माजी आमदार अमरगौडा पाटील
सहकार्याविरुद्ध तक्रार करणार्या पीडितेच्या नातेवाइकांना कर्नाटकातील काँग्रेसच्या माजी आमदाराने धुडकावून लावले !
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘एकटा पुरुष महिलेवर बलात्कार करू शकत नाही, यासाठी ३-४ लोकांची आवश्यकता असते’, असे दायित्वशून्य विधान कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी आमदार अमरगौडा पाटील यांनी केले. एका बलात्कार पीडितेविषयी तिच्या सासर्यासमवेत दूरभाषवर बोलतांना पाटील यांनी हे विधान केले. त्यांच्यातील संभाषण मुद्रित करून ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आले आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर टीका होत आहे; मात्र हे संभाषण खरे आहे कि कसे ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
६ ऑक्टोबर या दिवशी अमरगौडा पाटील यांचा सहकारी संगनगौडा पाटील याच्यावर कोप्पल जिल्ह्यातील तावरगेरा येथे शेतात काम करणार्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. बलात्कार पीडितेने १८ ऑक्टोबर या दिवशी तावरगेरा पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या संदर्भात महिलेच्या सासरकडील लोकांनी अमरगौडा यांच्याकडे तक्रार केली. त्या वेळी पीडितेचे सासरे आणि पाटील यांच्यात दूरभाषवर संभाषण झाले. त्यात पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केले.
पाटील संभाषणात म्हणाले की, एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यासाठी किमान ३-४ लोकांची आवश्यकता असते. या जगात असा कुणीच नाही, जो एकटा बलात्कार करू शकतो. मला दाखवा. तो कितीही बलवान असला, तरी असे कुणीही करू शकत नाही. एखादी व्यक्ती असे करू शकते, हे तुम्ही सिद्ध करा. महिला किंचाळली नसती का ? कुणीही एका हाताने टाळी वाजवू शकत नाही. यासाठी २ हात लागतात. तुम्ही एक निरोगी माणूस आणा आणि मी एक बाई पाठवीन. तिला विचारा की, तिच्यावर बलात्कार होऊ शकतो का ?
संपादकीय भूमिकातक्रार करणार्याला अशा प्रकारे सुनावणार्या काँग्रेसवाल्यांची मानसिकता काय आहे, हे लक्षात येते ! कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्तेत बसवणार्या लोकांना हे मान्य आहे का ? |