डोकेदुखी नेमकी कशाने होते ?
डोके दुखले की, लगेच गोळी घेऊन ती डोकेदुखी तात्पुरती थांबवली जाते. यामुळे डोकेदुखी तात्पुरती थांबली असली, तरी परत परत डोके दुखण्याचा त्रास बर्याच रुग्णांमध्ये आढळून येतो. डोकेदुखीचे मूळ कारण लक्षात न घेता फक्त डोकेदुखी थांबण्यासाठी औषधे घेणे योग्य नाही. बर्याच जणांना आपण खाण्या-पिण्यात काय चूक केली आहे आणि कशामुळे डोके दुखत आहे ? हे लक्षात येत असते. जसे की, जागरण केल्याने, पित्त वाढवणारे पदार्थ खाल्ल्याने इत्यादी. अशा दिनचर्येत कधीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या, तरी डोकेदुखी उद़्भवते; परंतु वारंवार आपल्या आहार विहारात चुका घडत असतील, तरी डोकेदुखी वारंवार होत रहाते.
काही जणांमध्ये इतर आजारांचे लक्षण म्हणून सुद्धा डोकेदुखी होते. आज आपण डोकेदुखीची कारणे कोणकोणती असू शकतात ? ते समजून घेणार आहोत. यामुळे आपली डोकेदुखी नेमकी कशामुळे आहे, हे स्वतःचे स्वतःला अभ्यासता येईल. त्यामुळे लगेच डोकेदुखीची गोळी न घेता त्याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतील.
१. शारीरिक कारणे
अ. मेंदूचे विविध आजार असतांना जसे मेंदूच्या जागी कुठेही गाठ असणे किंवा मेंदूच्या भोवती असणार्या आवरणाला सूज आली असेल, तरी डोके दुखते. डोक्याला कुठे मार लागला असेल, मार लागल्याने मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असेल, तर डोके दुखते.
आ. मानेच्या मणक्यांमधील रचना बिघडल्यास डोके दुखू शकते.
इ. दात अथवा कान यांच्या दुखण्याचाही परिणाम म्हणून डोकेदुखी होते.
ई. उलट्या किंवा जुलाब होणे वा रक्तस्राव होणे, शरिरातील पाण्याची पातळी न्यून होणे इत्यादींमुळे डोके दुखू शकते.
उ. रक्तदाब वाढल्यास मूत्रपिंडाचे विविध आजार, रक्तातील साखर न्यून किंवा अधिक होणे, शरिरातील चयापचायाची क्रिया बिघडणे यांमुळे डोकेदुखी उद़्भवते.
ऊ. दारूचे व्यसन असतांना जर दारू मिळाली नाही किंवा वेळेवर चहा अथवा कॉफी मिळाली नाही तरीही डोके दुखते.
ए. डोळ्यांवर ताण येत असल्यास मागील बाजूस डोके दुखायला लागते. चष्म्याचा क्रमांक असून चष्मा न लावल्याने सुद्धा डोके दुखू लागते.
ऐ. विविध औषधांचा परिणाम म्हणून सुद्धा डोकेदुखी उद़्भवते.
ओ. लघवी, संडास, शिंका, जांभया आणि दुःख यांचे वेग आले असतांना ते दाबून धरल्यास डोके दुखते.
औ. दुपारी अधिक झोप किंवा रात्री जागरण केल्यास डोके दुखते.
अं. अती श्रम, अती प्रवास, अती बोलणे.
क. धुरकट, थंड हवामानात किंवा उन्हामध्ये पुष्कळ फिरणे.
ख. कर्कश आवाजात ऐकणे, रात्रभर टीव्ही बघणे इत्यादी.
ग. अपचन, अती आहार, तळलेले, तिखट, खारट, आंबट पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
२. मानसिक कारणे
काळजी, भीती, राग आणि दुःख ही डोकेदुखीची मानसिक कारणे आहेत. आपल्या मनातील विचारांचा आपल्या शरिरावर परिणाम होत असतो, हे आपण यापूर्वी बघितले आहे.
३. वारंवार होणार्या डोकेदुखीमध्ये वैद्यांचा सल्ला महत्त्वाचा !
एका डोकेदुखीची वरीलप्रमाणे अनेक कारणे आहेत. आपल्या डोकेदुखीची नेमकी कारणे शोधणे, हीसुद्धा एक डोकेदुखीच असते. कधीतरी उद़्भवलेली डोकेदुखी असल्यास त्यावर घरगुती उपचार करण्यात हरकत नाही. बरेच जण ‘पॅरासिटॉमॉल’सारख्या गोळ्या घेतातही; पण गंभीर डोकेदुखी होत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वैद्यांच्या सल्ल्याने विविध तपासण्या आणि औषधोपचार करायला हवा. तीव्र स्वरूपाच्या आणि वारंवार होणार्या डोकेदुखीमध्ये मनाने औषधोपचार करू नये.
४. डोकेदुखी न होण्यासाठी आपल्या दिनचर्येत कसा पालट करावा ?
डोकेदुखी न होण्यासाठी आपल्या दिनचर्येत पालट करायला हवा किंवा कशी काळजी घ्यावी, ते आता समजून घेऊया.
अ. गार वार्याचा आणि तीव्र उन्हाचा थेट संपर्क टाळण्यासाठी बाहेर निघतांना डोक्याला रुमाल बांधणे अन् कानात कापूस घालणे, ही काळजी अवश्य घ्यावी.
आ. डोक्याला नियमितपणे तेल लावावे. दोन्ही नाकपुड्यांमध्ये देशी गायीचे तूप २-२ थेंब घालावेत. झोप येत नसल्यास रात्री झोपतांना तळपायांना सुद्धा तेल लावून मालिश करावे.
इ. जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात.
ई. आयुर्वेदामध्ये डोकेदुखी नेमकी कोणत्या दोषामुळे होते ? हे महत्त्वाचे ठरते आणि त्याप्रमाणे खाण्या-पिण्यात पालट सुचवले जातात. वातामुळे डोकेदुखी असेल, तर त्याप्रमाणे आहारात दूध, तूप, लोणी असे स्निग्ध पदार्थ असावेत. शिळे आणि कोरडे अन्न खाऊ नये. ताजे आणि गरम जेवावे. लघवी आणि संडास यांचे वेग आल्यावर ते रोखून धरू नयेत. त्यामुळे वाताची गती बिघडून अनेक विकार निर्माण होतात.
उ. डोकेदुखी ही पित्त दोषामुळे असेल, तर तेलकट, मसालेदार आणि आंबवलेले पदार्थ वर्ज्य करावेत, तसेच राग येणे या दोषावरही प्रयत्न केले पाहिजेत.
ऊ. मनातील दुःख मनात ठेवल्याने, अतीविचाराने सुद्धा डोकेदुखी वाढते. अशा वेळी योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेणे, मनमोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा लाभ आपल्याला इथे दिसून येतो.
ए. आयुर्वेदामध्ये डोकेदुखीच्या स्वरूपानुसार विरेचन, शिरोधारा, नस्य, रक्तमोक्षण असे विविध उपचार केले जातात. वैद्यांच्या सल्ल्याने हे उपचार अवश्य करून घ्यावेत.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२०.११.२०२३)