एकादशी व्रताचे पालन कसे कराल ?
जर सूर्योदयसमयी किंचित् एकादशी, नंतर मधला काळ द्वादशी आणि अंत समयी किंचित् त्रयोदशी असेल, तर तिला ‘त्रिस्पृशा’ एकादशी म्हणतात. ती भगवंतांना अतिशय प्रिय आहे. जर एका त्रिस्पृशा एकादशीला उपवास केला, तर १ सहस्र पटींनी फळ प्राप्त होते आणि त्याच प्रकारे द्वादशीला व्रताचे पारणे केल्याने सहस्र पटींनी फळ प्राप्त होते; परंतु एकादशी दशमीला प्रारंभ होत असेल, तर त्या दिनी व्रत पालन करू नये. परिवर्तिनी तिथीयुक्त झाल्यावर उपवास करण्याचे विधान आहे. पहिल्या दिवशी दिवसा आणि रात्रीही एकादशी असेल अन् दुसर्या दिनी प्रातःकाळी काही क्षण एकादशी असेल, तर पहिल्या दिनी उपवास न करता दुसर्या द्वादशीयुक्त एकादशीला व्रत पालन करावे. जो मनुष्य विधीपूर्वक एकादशींचे व्रत पालन करतो, तो भगवद़्धामास जातो आणि साक्षात् परिसेवा प्राप्त करतो. जो कृष्णभक्त प्रत्येक वेळी एकादशीचे महात्म्य वाचतो अथवा श्रवण करतो त्याला सहस्र गोदानाचे फळ मिळते.
(साभार : ‘गोडसेवादी’, जुलै २०१६)