राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना सरकारने दिला मंत्रीपदाचा दर्जा !
मुंबई – राज्यातील शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही योग्य दरात शेतमाल खरेदी करता यावा, यासाठी राज्यशासनाने राज्य कृषी मूल्य आयोगाची निर्मिती केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांना राज्यशासनाने मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. २१ नोव्हेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
सय्यद पाशा उस्मानसाहेब पटेल यांची १८ ऑक्टोबर २०२३ या दिवशी राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना केंद्रीय कृषी मूल्य आणि मूल्य आयोग यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करावे लागते. हे दायित्व पहाता राज्यशासनाने या पदाला मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.