एकादशीविषयी भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्यात झालेला संवाद…
उद्या (२३.११.२०२३ या दिवशी) कार्तिकी एकादशी आहे. त्या निमित्ताने…
‘एकादशीची उत्पत्ती कशी झाली ? आणि ही तिथी कशी पालन करावी ? यासंबंधी भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्यात झालेला संवाद पद्म पुराणातील उत्तर खंडात असून तो पुढीलप्रमाणे आहे.
‘उत्तम व्रताचे पालन करणार्या भक्ताने दशमी तिथीला एकभुक्त रहावे. दशमीची रात्र व्यतित झाल्यानंतर एकादशीला ब्राह्म मुहूर्तावर उठावे आणि प्रातःकालीन शौच स्नानादी आटोपून व्रताचा एकचित्त दृढ संकल्प करावा. पवित्र राहून काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा. अन्त्यज, पाखंडी, मिथ्याचारी, साधू-ब्राह्मण निंदक, दुराचारी, परधन चोरणारे, जुगारी आणि दारूडे यांच्याशी वार्तालाप करू नये. भगवान श्रीकेशव यांची आराधना करावी. भगवंताला भोग अर्पण करावा. या दिनी निद्रा आणि मैथुन पूर्णपणे त्याग करावे. रात्री जागरण करत कीर्तन करावे. काळ्या आणि पांढर्या गायींचे दूध जसे सारखेच असते, तसेच शुक्ल अन् कृष्ण पक्षातील एकादशींमध्ये कोणताही भेद नाही. दोन्ही पक्षातील एकादशी व्रताचे विधीयुक्त पालन सारखे आहे आणि त्यांचे फळही सारखे आहे.’