‘अंनिस’ला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे खुले आव्हान !
|
पुणे – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर धाम सरकार यांच्या पुण्यात होणार्या सत्संग आणि दिव्य दरबार कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महाराष्ट्र अंनिस) विरोध केला होता. त्यावर २० नोव्हेंबर या दिवशी बागेश्वर बाबा यांनी समितीला खुले आव्हान दिले. ते म्हणाले, ‘माझ्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा. आपण ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करू, एकदाच आमने-सामने होऊन जाऊ द्या’, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. तसेच ‘भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी राज्यघटनेत पालट केला पाहिजे’, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा २० नोव्हेंबरपासून शहरातील संगमवाडी येथे ३ दिवसांचा सत्संग चालू आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शास्त्री पुढे म्हणाले की, सत्संगामध्ये बोलत असतांना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्याप्रमाणे कोण कोणता शब्द घेतो ? त्यावरून त्याची भूमिका ठरते. मी कधीही रावणाशी भ्रमणभाषवर बोललेलो नाही; पण कथा सांगतांना उदाहरण म्हणून दृष्टांत दिला जातो. त्या अर्थाने मी बोललो आहे. तसेच आजार बरे करण्यासाठी रुग्णालयात गेलेच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही आक्षेप असतील, तर त्यांनी माझ्या दरबारात यावे, त्यांना कुणीही अडवणार नाही.
भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे !
हिंदु राष्ट्राच्या भूमिकेविषयी ते म्हणाले की, भारताच्या राज्यघटनेमध्ये आतापर्यंत पुष्कळ वेळा सुधारणा करण्यात आलेले आहे. तर आणखी एकदा त्यात सुधारणा करून भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे. हिंदु राष्ट्र्र म्हणजे रामराज्य आहे. त्यामध्ये समानता, सुशासन आणि कर्तृत्वावर भर असेल. हिंदु राष्ट्र्र झाल्यानंतर मुसलमान अथवा ख्रिस्ती यांना देश सोडून कुठे जावे लागणार नाही; परंतु जे देशाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना धडा शिकवला जाईल.
काय होता अंनिसचा आक्षेप ?
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सत्संगामध्ये चमत्कार करतात, आजार बरा करतात, रावणाशी भ्रमणभाषवर संपर्क साधतात, तसेच संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात, असे आरोप करून अंनिसने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
संपादकीय भूमिकाआता अंनिस हे आव्हान स्वीकारेल कि त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार गप्प बसणार, हे तिने स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा हिंदूंच्या संतांवर चिखलफेक करणार्या अशा संघटनांना उत्तरदायी धरून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ! |