आग बघितल्यावर काय करावे ?
आग लहान आणि आवाक्यात असतांना विझवणे, हा अग्नीशमनाचा सर्वोत्तम उपाय आहे. असे असले, तरी आगीमुळे अपघात हे घडतच असतात. आग म्हटली की, आपल्याला आठवते ते अग्नीशमन दल आणि घंटा वाजवत येणारा आगीचा बंब ! परंतु आपल्याकडे (भारतात) अग्नीशमन दले शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणीच आढळतात; खेड्यापाड्यात नाहीत. कित्येकदा अग्नीशमन दलाचे साहाय्य मिळेपर्यंत आगीने आपला कार्यभाग साधलेला असतो. कोणतीही आग वेळीच उपाययोजना केल्यास त्वरित आटोक्यात येऊ शकते. कोठेही आग लागलेली आढळल्यास काय कृती करायची, हे ‘शमन’ या शब्दावरून समजते.
श – शोध घ्या
म – माहिती द्या किंवा मर्यादेत ठेवा
न – नष्ट करा
१. शोध घ्या : आग किती मोठी आहे, आगीचे नेमके स्थान कोणते, कोणत्या प्रकारचे पदार्थ जळत आहेत, कुणी माणसे आगीत अडकली आहेत का ? इत्यादी माहिती शोधा/मिळवा.
२. माहिती द्या : अग्नीशमन दल, पोलीस, नगरपालिका यांना आगीविषयी कळवा. ‘आग-आग’ असे मोठमोठ्याने ओरडून अवतीभोवतीच्या लोकांना सावध करा.
३. मर्यादेत ठेवा (नियंत्रणात ठेवा) : अग्नीशमन दलाचे साहाय्य येईपर्यंत आग मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा. दारे-खिडक्या बंद करा. वीजपुरवठा बंद करा. सभोवतालचे ज्वलनशील पदार्थ सुरक्षित स्थळी हलवा. शक्य असल्यास आगीच्या सभोवतालचा परिसर पाण्याच्या फवार्याने भिजवा.
अ. दारे-खिडक्या बंद करण्याचे महत्त्व : कोणताही पदार्थ जळत असतांना ज्वलनाच्या क्रियेतून निर्माण होणार्या वायूंचे, ते हलके असल्यामुळे ऊर्ध्वगमन होत असते. या ऊर्ध्वगमनामुळे बाह्य हवेच्या दाबापेक्षा आगीतील वायूचा दाब घटतो. दाबातील या भेदामुळे बाहेरून आत असा हवेचा प्रवाह चालू होतो. या नैसर्गिक प्रवाहामुळे आगीला हवेचा पुरवठा विनासायास चालू रहातो. दारे-खिडक्या बंद केल्याने हा नैसर्गिक प्रवाह बंद होऊन आग दडपली जाते.
४. नष्ट करा : योग्य अग्नीशमनाचे माध्यमवापरून आग विझवा.
- घाबरू नका.
- ‘अलार्म’ बटण दाबा.
- शक्य असल्यास अग्नीशमन केंद्राला संपर्क करा.
- लवकरात लवकर इमारतीच्या बाहेर पडा.
- अग्नीशमनानंतर संबंधित तज्ञांच्या अनुमतीविना इमारतीत प्रवेश करू नका.
- ठरलेल्या ठिकाणी एकत्र या.
- इमारतीतील उद़्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर करू नका.
- स्वतःलाच आग लागल्यास थांबा – जिथे आहात तिथे, पडा – भूमीवर, लोळा – भूमीवर लोळण घ्या.
- साथीदाराला आग लागल्यास रग, घोंगडी, सतरंजी किंवा कोणतेही जाड कापड घेऊन जळणार्याभोवती गुंडाळा.
१. आग विझल्यावर त्याच्या अंगावरील जळके कपडे काढून टाका.
२. योग्य प्रथमोपचार द्या.
यामुळे ज्वाळा दडपल्या जाऊन विझतील आणि तुमचा जीव वाचू शकेल. कपड्यांना आग लागली असता घाबरून पळू नका.
उंच इमारतीला आग लागणे
१. गोंधळून न जाता पायर्यांचा (जिन्याचा) एकाच बाजूने वापर करून शिस्तीत खाली उतरा.
२. आगीमुळे खाली येणे शक्य नसल्यास एकत्र जमा व्हा, म्हणजे अग्नीशमन दलाला तुमची सुटका करणे सोपे जाईल.
३. रुग्णाईत (आजारी), वृद्ध आणि स्त्रिया यांची प्रथम सुटका करा, तसेच शेजार्यापाजार्यांना साहाय्य करा.
४. घाबरून उंचावरून उडी मारू नका.
५. उद़्वाहनाचा (लिफ्ट) वापर पूर्णपणे टाळा आणि इतरांनाही करू देऊ नका. शक्य असल्यास उद़्वाहन तळमजल्यावर आणून त्याचा वीजपुरवठा बंद करा.
६. आग लागलेल्या माळ्यांचा वीजपुरवठाबंद करा.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अग्नीशमन प्रशिक्षण’)
स्वयंपाकघरातील आग टाळण्यासाठी उपाय
१. स्वयंपाकघराची मांडणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य अशी करा.
२. स्वयंपाक करतांना सैल, घोळसर कपडे घालू नका, साडीचा पदर नीट खोचून घ्या.
३. स्टोव्हवरून तापलेली (गरम) भांडी उतरवतांना नेहमीच सांडशीचा किंवा चिमट्याचा वापर करा. या कामी टॉवेल, फडके किंवा साडीचा पदर वापरणे अत्यंत धोक्याचे असते.
४. घरगुती वापराच्या वायूची शेगडी, स्टोव्ह किंवा ओव्हन चालू असतांना घर सोडून बाहेर जाऊ नका.
५. घरात कुणीच नसतांना किंवा झोपी जातांना मेणबत्त्या आणि तेलाचे दिवे विझवा.
६. घरगुती वापराच्या वायूची शेगडी किंवा स्टोव्ह नेहमी उंचावर ठेवा. लादीवर कधीच ठेवू नका.
७. शेगडीवर मुठीचे भांडे ठेवतांना मूठ आतल्या बाजूस ठेवा.
८. लाकडी कपाट, फळ्या, पडदे, कपडे इत्यादी ज्वलनशील वस्तू शेगडी /स्टोव्ह यांपासून दूर ठेवा.
९. लहान मुलांना स्वयंपाकघरात खेळू देऊ नका.
१०. मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतांना काळजी घ्या. ते बाह्यतः जरी गार वाटत असले, तरी आतील पदार्थांचे तापमान जास्त असू शकते. ओव्हनमधल्या पदार्थाने पेट घेतल्यास वीजपुरवठा त्वरित बंद करा आणि आग विझेपर्यंत ओव्हनचे दार उघडू नका.