शासनकर्त्यांच्या वेगळ्या धोरणांमुळे पेशव्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आला नाही ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक
‘माधवराव पेशवा : विजय आणि व्यथा’ पुस्तकाचा पुणे येथील प्रकाशन सोहळा !
पुणे – पेशव्यांनी मराठेशाहीचा इतिहास निर्माण केला. त्यांनी ब्राह्मणांचा इतिहास निर्माण केलेला नाही; परंतु शासनकर्त्यांच्या वेगळ्या धोरणांमुळे पेशव्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आला नाही, अशी खंत मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली. मुळा-मुठा प्रकाशनाच्या वतीने ‘माधवराव पेशवा : विजय आणि व्यथा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर आणि इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. पुस्तकाचे लेखक डॉ. उदय कुलकर्णी आणि अनुवादक डॉ. विजय बापये या वेळी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरंभलेले हिंदवी स्वराज्य निर्मितीचे कार्य थोरले माधवराव पेशवे यांनी पूर्ण केले. भूतकाळातील वाईट गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्वांनी इतिहास वाचला पाहिजे; परंतु त्यासाठी कादंबर्या, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपट यांवर विसंबून राहू नये.