नियमांचे पालन करा !
भारतात वर्ष २०२२ मध्ये ६६ सहस्र ७४४ लोकांचा शिरस्त्राण (हेल्मेट) आणि आसनपट्टा (सीट बेल्ट) न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झाला. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’ या अहवालानुसार ही संख्या रस्ते अपघातातील एकूण मृतांच्या ४० टक्के एवढी मोठी आहे. शिरस्त्राण आणि आसनपट्टा यांसारख्या सुरक्षिततेच्या उपायांचा अवलंब न केल्याने, अतीवेग आणि रस्त्याची (लेनची) शिस्त न पाळल्याने, वाहन चालवतांना भ्रमणभाष वापरल्याने, विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याने लोकांना जीव गमवावा लागला आहे. या अहवालानुसार २०२२ या वर्षी २०२१ या वर्षापेक्षा अपघातात ११.९ टक्के, मृत्यूंमध्ये ९.४ टक्के, तर घायाळांच्या प्रमाणात १५.३ टक्के वाढ झाली असल्याचे दिसते. अपघातांची कारणे शोधायची झाल्यास प्रामुख्याने मानवी मनाच्या जडणघडणीचा अभ्यास व्हायला हवा. मनुष्याचे मनावर नियंत्रण नसणे, संयमाचा प्रचंड अभाव, परिणामांचा विचार नसणे आणि ठरवून दिलेल्या कार्यपद्धतींचे पालन करण्याची वृत्ती नसणे हे स्वभावदोष प्रकर्षाने वरील अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे लक्षात येईल.
गेल्या वर्षभरात असे अनेक अपघात झाले. टाटा कंपनीचे माजी अधिकारी सायरस मिस्त्री यांचा अपघात मनाला चटका लावून गेला. आता सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध होत असल्यामुळे चूक नेमकी कुठे झाली, हेही शोधणे सोपे जात आहे. त्यातून इतरांनी धडा घेऊन शिकले पाहिजे. वाहन चालवण्याविषयी ठरवून दिलेले नियम न पाळता वाहन चालवणे, म्हणजे त्या संदर्भात ठरवून दिलेली कार्यपद्धत डावलण्यासारखे आहे. मुळात कार्यपद्धत अथवा नियम हे संभाव्य धोके, परिणामी होणारी जीवित आणि वित्त हानी, होणार्या चुका दुरुस्त करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, मनुष्यबळ आदी सर्व सूत्रे लक्षात घेऊन दूरदृष्टीने सिद्ध केलेले असतात.
इथे थेट जीवाशी संबंध असल्याने आपण अतिरिक्त सर्तकता बाळगायला हवी; मात्र चित्र पूर्णत: उलटे दिसून येते. वाहन चालवतांनाच पराकोटीचा निष्काळजीपणा केला जातो. ईश्वराने मनुष्याला विवेकबुद्धी देऊन योग्य क्रियमाण वापरण्याची संधी दिली आहे. त्यायोगे तो जीवनातील संभाव्य घटनांची परिणामकारकता न्यून करू शकतो. अपघात टाळण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची दृष्ट काढणे, प्रार्थना करणे, गाडीत नामजपाच्या पट्ट्या लावणे आदी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणेही क्रियमाणच आहे. क्रियमाण वापरून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची वृत्ती अंगी बाणवल्यास संभाव्य धोके टाळता येऊन अपघातांचे प्रमाण निश्चितच न्यून करता येईल !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.