वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळा, वेदभवनचा वर्धापनदिन महोत्सव १८ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित !
पुणे – येथील प्रसिद्ध असलेल्या वेदाचार्य श्री घैसासगुरुजी वेदपाठशाळा, वेदभवनचा वर्धापनदिन महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात विविध कार्यक्रमांच्या समावेशाने वेदभवनात साजरा होत आहे. वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळा गेली ७६ वर्षे वेदांचे अध्ययन, अध्यापन, प्रचार आणि प्रसाराचे कार्य अव्याहतपणे करत आहेत. या वेदभवनाचा वर्धापनदिन प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते.
या कार्यक्रमांसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून वेदमंत्रांचे श्रवण करून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत आणि प्रसाद ग्रहण करावा, असे आवाहन वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी केले आहे.
असे असेल कार्यक्रमांचे आयोजन !
१. २४ नोव्हेंबर या दिवशी वेदपाठशाळेचे संस्थापक वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसासगुरुजी यांचा २६ वा स्मृतीदिन (श्राद्ध) सकाळी आयोजित केला आहे. या साप्ताहिक कार्यक्रमात वेदपाठशाळेकडून ‘प्रतिवार्षिक पूजा कथासंग्रह’ या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
२. २५ नोव्हेंबरला या धार्मिक कार्यक्रमाची पूर्णाहुती सकाळी ११ वाजता होणार आहे.
३. २६ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वेदभवनाच्या पवित्र आणि रम्य परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.