आता शनिवारवाड्याचा इतिहास पर्यटकांना ‘डिजिटल ऑडिओ’च्‍या माध्‍यमातून अनुभवता येणार !

शनिवार वाडा, पुणे

पुणे – शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना ‘डिजिटल ऑडिओ’च्‍या माध्‍यमातून अनुभवता येणार आहे. लवकरच ही सुविधा उपलब्‍ध होणार असून त्‍यासाठी विद्युत् विभागाने सादर केलेल्‍या प्रस्‍तावाला महापालिकेच्‍या स्‍थायी समितीने मान्‍यता दिली आहे.

पुरातत्‍व विभागाकडून वर्ष १९१९ मध्‍येच शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्‍तू म्‍हणून घोषित करण्‍यात आला आहे. सायंकाळी येथे ‘साउंड अँड लाइट शो’द्वारे (ध्‍वनी आणि प्रकाश यांचा समावेश असलेला माहितीपट) शनिवारवाड्याची, पेशव्‍यांच्‍या इतिहासाची माहितीही दिली जाते; मात्र दिवसा येथे येणार्‍या पर्यटकांना केवळ तज्ञ मार्गदर्शकांवर (गाईड) अवलंबून रहावे लागते. त्‍यामुळेच पालिकेकडून शनिवारवाडा परिसरात ‘डिजिटल ऑडिओ गाईड’ सुविधा उपलब्‍ध करून दिली जाणार आहे.

शनिवारवाडा परिसरात ‘क्‍यू. आर. कोड’ असलेले फलक बसवले जातील. पर्यटक आपल्‍या भ्रमणभाषद्वारे हा कोड ‘स्‍कॅन’ करतील. त्‍यानंतर मराठी, हिंदी अथवा इंग्रजी या भाषांतून त्‍यांना शनिवारवाड्याचा इतिहास ऐकता येणार आहे. मराठीसाठी ५० रुपये, हिंदीसाठी ७५ रुपये, तर इंग्रजीतून माहितीसाठी १०० रुपये शुल्‍क आकारले जाणार आहे. परदेशी पर्यटकांसाठी अन्‍य भाषांमधूनही लवकरच ही माहिती उपलब्‍ध करून दिली जाणार आहे.