युद्धात हमासला पराभूत करण्यात इस्रायल अपयशी ! – इराणच्या प्रमुखाचा दावा
तेहरान (इराण) – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी हमासविरोधातील युद्धावरून इस्रायलवर टीका करतांना ‘गाझामध्ये इस्रायलच्या सरकारचा पराभव, हे सत्य आहे. रुग्णालयांमध्ये किंवा लोकांच्या घरात घुसणे, हा काही विजय नाही. विजयाचा अर्थ म्हणजे दुसर्या पक्षाला पराभूत करणे आहे. इस्रायलने गाझावर मोठ्या प्रमाणात बाँबफेक केल्यानंतरही अपेक्षित यश मिळवण्यात तो अपयशी ठरला आहे’, असे म्हटले आहे. खामेनेई यांनी इस्लामी देशांना आवाहन करतांना इस्रायलसमवेतचे संबंध तोडण्यास सांगितले आहे. ‘काही इस्लामी सरकारांनी अद्यापही गाझामधील आक्रमणाच्या इस्रायलच्या कारवाईचा निषेध केलेला नाही, हे अस्वीकार्ह आहे’, असे खामेनेई यांनी म्हटले आहे.
खामेनेई यांनी अमेरिकेवर टीका करतांना म्हटले की, इस्रायलच्या अपयशातून त्याला साहाय्य करणारी अमेरिका आणि युरोपीय देश यांचीही अकार्यक्षमता यातून दिसत आहे. इस्रायलने सहस्रो मुलांना ठार केले; मात्र त्याला याचा पश्चात्ताप नाही; कारण तो स्वतःला श्रेष्ठ समजतो.