प्रथमोपचारकात आवश्यक असणारे गुण
१. व्यावहारिक गुण
१ अ. नीटनेटकेपणा : प्रथमोपचार करतांना सर्व कृती शांतपणे, काळजीपूर्वक, योग्य गतीने, अचूकपणे आणि नीटनेटकेपणाने कराव्यात.
१ आ. काटकसरीपणा : प्रथमोपचारासाठी लागणार्या साहित्याची उपलब्धता भरपूर असो वा अल्प (कमी), प्रथमोपचाराच्या साहित्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे.
१ इ. प्रसंगावधान, कल्पकता आणि अभ्यासू वृत्ती : घटनास्थळी उपलब्ध साधनसामुग्री आणि उपलब्ध व्यक्ती यांच्या साहाय्याने प्रथमोपचार करता येण्यासाठी प्रथमोपचारकाकडे प्रसंगावधान, कल्पकता अन् अभ्यासू वृत्ती असली पाहिजे.
१ ई. संघटनकौशल्य : काही वेळा अपघातस्थळी समन्वयाचा गोंधळ असतो. अशा परिस्थितीत अपघाताच्या ठिकाणी साहाय्यासाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींसह संघटितपणे काम करण्याचे कौशल्य प्रथमोपचारकाने आत्मसात् करायला हवे.
१ उ. नेतृत्वगुण : रुग्णाचे निरीक्षण करून चटकन् निर्णय घेणे, रुग्णाला धीर देणे, त्याला न्यूनतम (कमीतकमी) त्रास होईल अशा पद्धतीने हाताळणे, रुग्णाच्या नातेवाइकांना युक्तीपूर्वक निरोप पाठवणे, प्रथमोपचार करतांनाच आवश्यकतेनुसार रुग्णाला रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन करणे इत्यादी कृती करण्यासाठी प्रथमोपचारकाने स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे अत्यंत आवश्यक असते.
२. मानसिक गुण
२ अ. निर्भयता : रुग्ण रक्तबंबाळ असणे, त्याचा घटनास्थळीच मृत्यू होणे आदी प्रसंगांना प्रथमोपचारकाला निर्भयपणे तोंड देता आले पाहिजे.
२ आ. संयम : भूकंप, मोठी वास्तू (इमारत) कोसळणे, पूर येणे यांसारख्या आपत्तींच्या वेळी अनेक जण दुखापतग्रस्त होतात. अन्य प्रकारची हानीसुद्धा पुष्कळ झालेली असते. अशा वेळी प्रथमोपचारकाने संयमाने अन् मनाने स्थिर राहून उचित कृती करणे अपेक्षित असते.
२ इ. आज्ञापालन करणे : प्रथमोपचार करतांना तज्ञांचे आज्ञापालन करणे आवश्यक असते.
३. आध्यात्मिक गुण
३ अ. प्रथमोपचार ही ‘साधना’ असल्याचे समजणे : वैयक्तिक आध्यात्मिक प्रगतीसाठी करावयाच्या प्रयत्नांना ‘साधना’ म्हणतात. ‘सकाम साधना’ आणि ‘निष्काम साधना’ हे साधनेचे दोन प्रकार आहेत. सकाम साधना ही वैयक्तिक अपेक्षांच्या (उदा. कुटुंबाचे कल्याण, अपत्यप्राप्ती आदींच्या) पूर्तीसाठी केली जाते, तर रुग्णांवर प्रथमोपचार करणे, तसेच इतरांना प्रथमोपचार करण्यास शिकवणे, ही समष्टीच्या हितासाठी केलेली एकप्रकारची निष्काम साधनाच आहे !
३ आ. अखंड नामजप करणे : उपास्यदेवतेचा नामजप करत केलेले कमर्र् (उदा. प्रथमोपचार) ‘अकर्म कर्म’ होतेे, म्हणजेच कर्त्याला त्याचे पाप-पुण्य लागत नाही, तर त्याची ‘साधना’ होते.
३ इ. कर्तेपणा ईश्वराला अर्पण करणे : प्रथमोपचारकाने रुग्णावर उपचार करतांना ‘प्रत्येक कृती ईश्वरच माझ्या माध्यमातून करत आहे’, असा भाव ठेवल्यास त्यातून ‘निष्काम कर्मयोग’ घडतो.
३ ई. प्रीती : ‘प्रेम करणे’ म्हणजे ‘प्रीती करणे’ नव्हे. प्रेमात बहुतांश वेळी अपेक्षा असतेे. प्रथमोपचारकाला अपेक्षा न ठेवता रुग्णावर सेवाभावी वृत्तीने उपचार करता आले पाहिजेत !
(या अंकातील प्रथमोपचाराशी संबंधित लिखाणाचा संदर्भ : सनातनचे ग्रंथ ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’)
आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क करा !१. पोलीस : १०० २. अग्नीशमन दल : १०१ ३. रुग्णवाहिका : १०२ |