Goa Politics : नीलेश काब्राल यांचे मंत्रीपदाचे त्यागपत्र

आलेक्स सिक्वेरा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल आणि आमदार आलेक्स सिक्वेरा

पणजी, १९ नोव्हेंबर (वार्ता.) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांना मी वैयक्तिक स्तरावर मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन आणि पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र राज्यपालांकडे सुपुर्द केले आहे. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी मंत्री काब्राल यांचे त्यागपत्र स्वीकारले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांना दिली. १९ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता राजभवन येथे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल पिल्लई यांनी त्यांना शपथ दिली.

आलेक्स सिक्वेरा (डावीकडील) यांनी शपथ घेतल्यावर त्यांना पुष्पगुच्छ देतांना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई मध्यभागी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गतवर्षी आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्यासह काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या वेळी यामधील प्रमुख काही आमदारांना भाजप मंत्रीपद देणार असल्याची चर्चा होती. प्राप्त माहितीनुसार नीलेश काब्राल यांच्याकडे असलेली मंत्रीपदे आलेक्स सिक्वेरा यांना देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘आमदार सिक्वेरा यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याच्या आश्वासनावर पक्षात घेण्यात आले होते. त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आता आलेली असल्याने पक्षाने हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये. नीलेश काब्राल यांच्यावर कुठलाही आरोप नाही आणि कोणत्याही आरोपामुळे त्यांना मंत्रीमंडळातून काढण्यात आलेले नाही. नीलेश काब्राल हे भाजपच्या गाभा समितीचे सदस्य असल्याने पक्षाचा निर्णय त्यांना मानावा लागतो. यापूर्वीही अनेकांनी अशाच प्रकारे पदांचा त्याग केलेला आहे आणि त्यांना नंतर इतर दायित्व देण्यात आले आहे.’’