तापामध्ये काही वेळेला भूक खूप लागते. अशा वेळी ‘पचनशक्ती चांगली आहे’, असे समजावे का ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५२
‘काहींना ताप आलेला असतांनाही पुष्कळ भूक लागते. अशा वेळी ‘भूक चांगली लागली, म्हणजे आपला अग्नी (पचनशक्ती) चांगला आहे’, असे समजू नये. अग्नी मंद असतांनासुद्धा भूक लागू शकते. हे कसे, ते समजण्यासाठी एक व्यावहारिक उदाहरण पाहू.
चुलीवर एका पातेल्यात तांदूळ शिजत ठेवले आहेत. अशा वेळी चुलीतील अग्नी बाहेर काढला, तर पातेल्याला खालून धग लागणार नाही; मात्र चुलीसमोर बसलेल्या माणसाला त्याची धग जाणवेल. अशा अग्नीचा पातेल्यातील तांदूळ शिजवण्यासाठी काही उपयोग होणार नाही. थोडक्यात अग्नी केवळ पेटलेला असून चालत नाही, तर तो योग्य ठिकाणी असावा लागतो.
तापामध्ये अग्नी जठरातून बाहेर रक्तात आलेला असतो. त्यामुळे त्या अग्नीच्या धगामुळे भूक लागते; पण अग्नी पोटात न्यून असल्याने जेवलेले अन्न नीट पचवू शकत नाही. अन्न नीट न पचल्यास ते अर्धवट पचलेल्या स्थितीत रक्तात शोषले जाते. ते पूर्ण पचवण्यासाठी रक्तामध्ये अग्नी अजून भडकतो आणि ताप वाढतो. त्यामुळे तापामध्ये काही वेळेला ‘भूक खूप लागते’, असे जरी असले, तरी नेहमीसारखे जेवण न जेवता ‘लेखांक २५०’ मध्ये दिल्यानुसार हलक्या आहारापासूनच आरंभ करावा.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan