वाशी-तुर्भे येथील पदपथांसह रस्त्यांवर वाहने दुरुस्ती आणि विक्री यांमुळे पादचारी त्रस्त !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उदासीनतेचाच हा परिणाम !
नवी मुंबई, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी आणि तुर्भे विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात पदपथ अन् रस्ता यांवर दुचाकी, रिक्शा, चारचाकी यांच्या दुरुस्ती-विक्रीचा व्यवसाय चालू आहे. यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाशी आणि ए.पी.एम्.सी. पोलिसांनाही या प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार आहेत; मात्र ते कारवाई करण्यात स्वारस्य दाखवत नाहीत. (अशा कर्तव्यचुकार पोलिसांना निलंबित करायला हवे ! – संपादक) यामुळे सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (यात वरिष्ठ अधिकारी लक्ष का घालत नाहीत ? त्यांनी संबंधित कामचुकार अधिकार्यांवर कारवाई करायला हवी ! – संपादक)
१. वाशी विभाग कार्यालयाच्या अंतर्गत सेक्टर १७ मध्ये रस्त्यावरील दोन्ही मार्गिका गाड्यांच्या दुरुस्तीसाठी वापरल्या जातात. पामबीच मार्गावरील सेक्टर १९ चा सिग्नल ते कोपरी गावाजवळील उड्डाणपूल, सानपाडा सेक्टर ३, तुर्भे सेक्टर २०, २१, २६, कोपरी गाव, तुर्भे गाव, वाशी गाव या ठिकाणी सर्रासपणे पदपथ आणि रस्ता यांवर वरीलप्रमाणे व्यवसाय केला जातो. यामुळे तुर्भे वसाहतीमधील रहिवाशांना पदपथावरून ये-जा करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याची कुणीही लोकप्रतिनिधी, तथाकथित समाजसेवक, पालिका आणि पोलीस अधिकारीही नोंद घेत नसल्याने येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.
२. ‘वाहतूक पोलीस, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, पालिकेचे अधिकारी यांच्या गाड्यांची दुरुस्ती करणारे, वाहनांचे सुटे भाग विक्री करणारे दुकानदार यांच्याशी साटेलोटे असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही’, अशी चर्चा येथील रहिवाशांमध्ये आहे.