रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘शिबिरा’ला येण्यापूर्वी, आल्यावर आणि घरी आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. शिबिराला जाण्यापूर्वी साधिकेच्या आईचा पाय अकस्मात् सुजणे
‘जुलै २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या एका शिबिराला मी आणि माझी बहीण जाणार होतो. शिबिराला जाण्याच्या ४ दिवस आधी आईचा पाय अकस्मात् सुजला आणि तिला चालता येत नव्हते. त्यामुळे शिबिराला जाण्याच्या संदर्भात माझ्या मनाची अस्थिरता वाढली.
२. आईचा गुरुदेवांप्रती भाव असल्यामुळे पायाची सूज अल्प होणे आणि दोघी बहिणींना शिबिराला जाता येणे
आम्हा दोघींपैकी एकटीनेच शिबिराला जाण्याचे ठरवले; पण आई म्हणाली, ‘‘तुम्ही दोघीही शिबिराला जा.’’ मी आणि बहिणीने विचारले, ‘‘आई, या अवस्थेत तू एकटी कशी रहाणार ?’’ तेव्हा आई म्हणाली, ‘‘अगं, मी कुठे एकटी आहे ? माझ्या समवेत परम पूज्य गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत. तुम्ही काळजी करू नका.’’ त्या वेळी माझे मन निर्विचार झाले. गुरुदेवांच्या प्रती सतत कृतज्ञता वाटू लागली. दुसर्या दिवशी औषधोपचारासह प्रार्थना, कृतज्ञता आणि गुरुदेवांची अपार कृपा यांमुळे आईच्या पायाची सूज उणावली. तिने आमची शिबिराला जाण्याची सिद्धताही केली.
३. शिबिरानंतर परीक्षा आल्यामुळे शिबिरात सहभागी होता येणे
शिबिराच्या कालावधीत माझ्या परीक्षेचा दिनांक पुढे-मागे होत होता. ‘शिबिराच्या वेळी माझी परीक्षा असू नये’, असे मला सतत वाटत होते. त्या वेळी आई आणि बहीण मला सतत सांगत होत्या, ‘‘प.पू. गुरुदेवांवर विश्वास ठेव. तुलाही शिबिराला जाण्याची संधी मिळेल.’’ प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे शिबिरानंतर परीक्षा आल्यामुळे मला ४ दिवस शिबिरात सहभागी होता आले.
४. शिबिरानंतर घरी आल्यावर आलेल्या अनुभूती !
४ अ. आश्रमात अनुभवलेले चैतन्य आणि आनंद आईला सांगितल्यावर स्वत:ची भावजागृती होणे : शिबिरानंतर घरी परत आल्यावर मी आईला आश्रमात अनुभवायला मिळालेले चैतन्य आणि आनंद याविषयी सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे तुम्हा दोघींना वैकुंठात जाण्याची संधी मिळाली. तुम्ही वैकुंठात गेला होता, तिथे आनंदाची अनुभूती निश्चितच येणार !’’ तेव्हा माझी भावजागृती झाली.
४ आ. सकारात्मक राहून प्रार्थना केल्यावर रामनाथी आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळणे : परीक्षा संपल्यावर रामनाथी आश्रमात सेवेला जाण्याचे नियोजन करण्यात अडचण येत होती. तेव्हा माझ्या मनाची स्थिती अस्थिर होत होती. तेव्हा आई आणि बहीण दोघींनी सांगितले, ‘‘प.पू. गुरुदेव आहेत ना ! मग तुला निश्चितच सेवेची संधी मिळेल आणि सतत सकारात्मक राहून प्रार्थना वाढव.’’ त्यामुळे मला सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारता आली. पुढे मला श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच आश्रमात सेवेसाठी येण्याचा निरोप आला.
हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच शक्य झाले. त्याबद्दल गुरुदेवांच्या कोमल चरणी अत्यंत शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्रतिभा पुंडलिक दुंडगे, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. (२१.१०.२०२२)
.या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |