भाव मोती तुमचे ।

‘गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) कविता आवडल्‍यावर ते मला प्रसाद पाठवतात. तेव्‍हा मला आनंद तर होतो; पण ‘सर्व काही त्‍यांनीच सुचवलेले आहे’, याची जाणीव आणखी दृढ होते. ‘ते जे सुचवत होते, ते मी ग्रहण करू शकले’, याचे त्‍यांना कौतुक वाटले आणि मला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी त्‍यांनी प्रसाद दिला आहे’, या दृष्‍टीने सुचलेल्‍या ओळी,

सौ. स्‍वाती शिंदे

शब्‍द मोती तुमचे ।
भाव मोती तुमचे ।
मात्र क्षण मोती माझे ।
तव सहवासाचे ॥

हे गुरुदेव,

विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी तुमची असल्‍याने माझ्‍याकडून जे काही लिहिले जाते, ते सारे तुमचेच आहे. गुरुदेव, मी केवळ ते ग्रहण करण्‍याचे माध्‍यम आहे, याविषयी मला सतत कृतज्ञताभावात रहाता येऊ दे.’

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (१४.८.२०२३)


देव माझा भावाचा भुकेला ।

‘भाव हा घटक अष्‍टांग साधनामार्गातील महत्त्वाचा घटक आहे. भाव नसेल, तर देव कसा दिसेल ? देवाकडे जाण्‍याचे आणि त्‍याला पहाण्‍याचे ‘भाव’ हेच एकमेव माध्‍यम आहे. भावामुळे देवाला पहाण्‍याची दृष्‍टी मिळते. एकदा याविषयी विचार करतांना सुचलेल्‍या ओळी,

वाटले भाव घेऊनिया जावे ।
देवा पाहूनिया यावे ॥ १ ॥

भाव पाहूनिया देव राहिना एकटा ।
म्‍हणे सोबत येऊन राहीन अंतरात आता ॥ २ ॥

भाव घेऊनिया गेले ।
देवा घेऊनिया आले ॥ ३ ॥

देव माझा भावाचा भुकेला ।
भाव घेऊनी माझा सोबती तो झाला ॥ ४ ॥

असेल भाव अंतरात, तर देव राहील अंतरात ।
मन माझे देवा नित्‍य राहो तुझ्‍या स्‍मरणात ॥ ५ ॥

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक