जन्मतः साधनेची समज, प्रगल्भ बुद्धीमत्ता आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कतरास (झारखंड) येथील कु. श्रीहरि खेमका (वय ६ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीहरि खेमका हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
११.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी कतरास (झारखंड) येथील पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे समष्टी संत) यांचा नातू कु. श्रीहरि (वय ६ वर्षे) याच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या समष्टी संत) आणि पू. गीतादेवी खेमका (सनातनच्या ८३ व्या व्यष्टी संत) यांनी कु. श्रीहरीची सांगितलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. या लेखाचा काही भाग आपण १८ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/738553.html
६. लहानपणीच ग्रंथांचा भावार्थ जाणून सांगणे
कु. तेजल : पू. भाभी, त्याच्या ग्रंथवाचनाविषयी सांगा.
पू. (सौ.) खेमका : तो एकदम लहान होता, म्हणजे जेव्हा त्याला उभेही रहाता येत नव्हते. तेव्हा त्याला ग्रंथ दाखवला. ग्रंथ वाचतांना जशी दृष्टी फिरते, त्यानुसार तो सर्व ग्रंथाचे वाचन करत आहे, असे करायचा. मी त्याला म्हणायची, ‘तू ग्रंथ वाचत आहेस का ?’ तेव्हा तो होकारार्थी मान हलवत असे. तो बोलायला शिकण्यापूर्वीची ती गोष्ट आहे. एकदा मी ८ – १० ग्रंथांची नावे वाचून त्याला एकदाच ऐकवली. त्यानंतर त्याने सर्व ग्रंथांचे, उदा. आपल्यामध्ये स्वभावदोष आहेत. त्यामुळे चुका होतात. त्या चुकांचे गाठोडे मोठे असते. त्यामुळे ते घेऊन मनुष्याला चढ चढायला कठीण जाते. हे सर्व स्पष्ट करून सर्व ग्रंथांचे सार एकत्रित करून आपल्या आई-वडिलांंना सांगितले. त्या सर्व ग्रंथांतून ‘आपण आनंदी कसे रहायचे ?’, ते त्याने सर्वांना सांगितले.
७. सात्त्विकतेमुळे सर्वांना आकर्षित करणे
कु. तेजल : या बालकांचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते सर्वांना आकर्षित करतात.
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (श्रीहरीची पणजी) : जयपूरमध्ये आमच्याकडे पाहुणे आले होते. तिच्यासह तिची मुलेही आली होती. ती मुले याला प्रतिदिन बाहेर घेऊन जात होती. त्यांना याच्या सान्निध्यात पुष्कळ आनंद मिळत होता.
कु. तेजल : दैवी बालके मुळातच सात्त्विक असतात. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात सर्वांना आनंद मिळतो. ते सर्वांना स्वत:कडे आकर्षित करतात.
पू. खेमका (आजोबा) : जेव्हा तो एक वर्षाचा होता, तेव्हा दैवी बालकांचे वेगळेपण कसे असते ? ते माझ्या लक्षात आले. आमच्या घरात सत्संग असतांना साधक येत होते. त्या वेळी हा साधकांच्या मांडीवर बसून संपूर्ण सत्संग ऐकत असे. हा साधकांच्या मांडीवरच बसत असे; परंतु दुसरे कुणी माझे मित्र किंवा व्यावसायिक असतात, जे साधना करत नाहीत, त्यांच्याकडे तो मुळीच जात नसे.
कु. तेजल : दैवी बालकांंना सात्त्विकतेची ओढ असते.
८. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक स्तरावर उत्तर देणे
कु. तेजल : पू. आई, आपण सांगावे. आपण त्याला बालपणापासून पहात आहात ना ? बालपणापासूनच श्रीहरीच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, बोलणे असे काही आपल्या लक्षात आले असेल, तर ते सांगा.
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका : याचे हेच वैशिष्ट्य आहे की, तो सतत हसत असतो आणि तो चूक करतो, तेव्हा स्वतःच प्रायश्चित्त घेतो.
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका : वर्ष २०२० मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्या घरात येताच म्हणाल्या, ‘‘श्रीहरि, आज माझा वाढदिवस आहे. मला भेटवस्तू दे ना !’’ तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘‘हा श्रीहरिच (बबुआच) तर काकूंची खरी भेट आहे.’’ (‘सद़्गुरु काकूंच्या चरणी मी स्वतःला अर्पण केले आहे’, असे श्रीहरीला म्हणायचे आहे.’ – श्रीमती अर्चना खेमका, श्रीहरीची चुलत आजी, पू. प्रदीप खेमका यांची वहिनी)
कु. तेजल : किती सुंदर आणि उत्स्फूर्त उत्तर दिले ना ! श्रीहरि, तू असे सद़्गुरु काकूंना म्हटले, ‘‘बबुआच भेट (गिफ्ट) आहे म्हणून !’’
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका : नंतर तो त्यांना म्हणाला, ‘‘आजी, कतरासमध्ये तुमची खोली तुमचीच प्रतीक्षा करत आहे.’’
९. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रतीचा भाव
पू. खेमका : जेव्हा तो बोलायला शिकत होता. तेव्हा एकदा म्हणाला की, ‘श्रीलाठी बाबा नमः । ‘श्रीलाठी बाबा नमः ।’ आम्ही विचारले की, याचा अर्थ काय आहे ? तेव्हा त्याने प.पू. भक्तराज महाराजांचे (बाबांचे) छायाचित्र दाखवून तो म्हणाला, ‘‘मी यांना ‘लाठी बाबा’ म्हणतो; कारण त्यांनी हातात काठी पकडली आहे.’’
त्याला आमच्यापैकी कुणीही हे शिकवले नव्हते. तो प.पू. भक्तराज महाराजांना ‘श्री लाठी बाबा’, असे म्हणतो आणि प.पू. डॉक्टरांना ‘बाबा’ म्हणतो. तो शिशुवर्गात जातांना बाबांना (प.पू. डॉक्टरांना) समवेत घेऊन जात असे. त्याला ती सवयच झाली आहे की, बाबांना समवेत घेऊन जायचे आणि बाबांच्यासह रहायचे. त्याचे वडील कार्यालयात जायला निघाले की, तो त्यांना आठवण करून द्यायचा, ‘बाबांना समवेत घेऊन जात आहात ना !’ त्याच प्रकारे आम्ही इकडे येत असतांना तो आम्हाला म्हणाला, ‘आजोबा, बाबांना समवेत घेऊनच बाबांना भेटायला जायचे आहे.’ जणू ‘प्रत्येक क्षणी प.पू. डॉक्टर त्याच्या समवेत आहेत’, असे वाटते.
कु. तेजल : पू. भैया, जसे आपण करता तेच संस्कार त्याच्यावर झाले आहेत की, प.पू. डॉक्टरांनाच आपल्या समवेत ठेवायचे.
१०. अनुभूती
१० अ. श्रीहरि रांगोळीवरून चालत जाऊनही रांगोळी पुसली न जाणे किंवा त्याच्या पायालाही रांगोळी न लागणे
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका : मागच्या वर्षी कतरासमध्ये गुरुपौर्णिमा असतांना मी तेथेच होते. तेथे व्यासपिठाच्या चारही बाजूंनी पांढरी चादर अंथरली होती आणि व्यासपिठासमोर मोठी रांगोळी काढली होती. त्या वेळी हा चारही बाजूंनी चप्पल घालून फिरत होता. तेव्हा एकदा त्याचा पाय रांगोळीवर पडला होता; परंतु ती रांगोळी पुसली नाही आणि चादरीवर त्याच्या चप्पलचे छाप उमटले नव्हते. हीसुद्धा एक विशेषच गोष्ट आहे.
पू. खेमका : प.पू. गुरुदेवांची कृपा आहे. साधकांनी पुष्कळ परिश्रम घेऊन ती रांगोळी काढली होती. हा तिच्यावरून चालत गेला होता. तेव्हा फार आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘रांगोळी पुसली गेली कि काय ?’, असे मला वाटले; म्हणून पहायला गेलो, तर रांगोळी जशीच्या तशी होती. त्याच्या पायाला रांगोळीचे रंगही लागले नव्हते; कारण की व्यासपिठावरील चादर पांढरी शुभ्र होती. त्याच्या चपलेला रंगीत रांगोळी लागली असती, तर त्याच्या पावलांचे ठसेे उमटले असतेे. दैवी बालक म्हणजे खरोखर ‘ईश्वर कशी कृपा करतो ?’, हे लक्षात आले. त्याने साधकांचे परिश्रम वाया जाऊ दिले नाहीत.
मी त्याला सांगितले, ‘‘बघ तू चालत होतास, तर ईश्वराला किती कष्ट घ्यावे लागले ! तुझ्या चपलेचे ठसे चादरीवर उमटले नाहीत आणि रांगोळीही पुसली गेली नाही.’’ तेव्हा तो एकदम गंभीर होऊन म्हणाला, ‘‘हो आजोबा ! तुम्ही योग्य सांगितले. मी प्रयत्न करतो. ती माझी चूक आहे. मी पुन्हा अशी चूक करणार नाही.’’ कोणतीही चूक झाल्यावर त्याला एकदा चूक सांगितली की, तो लक्षात ठेवतो. सारणीत लिहिल्यानंतर ती चूक तो पुन्हा करत नाही.
कु. तेजल : हेही विशेष आहे.
कु. तेजल : तर आपण आता थांबू या ? श्रीहरि आपण आता थांबू या का ? तुझे सगळे सांगून झाले ना ?
श्रीहरि : श्री विष्णवे नमः ।
कु. तेजल : हो ‘विष्णवे नमः ।’ सुंदर, तू नामजप करायला लागल्यावर आमचाही नामजप होऊ लागला आहे. आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
(समाप्त)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |