विलक्षण अवलिया सद़्गुरु श्री शंकर महाराज !
आज सद़्गुरु श्री शंकर महाराज यांचा प्रकटदिन. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
आजच्याच तिथीला वर्ष १७८५ मध्ये अंतापूर (जिल्हा नाशिक) या ग्रामी पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त श्री. नारायणराव अंतापूरकर आणि त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला अन् त्याच ‘शंकर’ नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला आणि आजही करत असल्याची अनुभूती अनेक जण घेत आहेत.
‘मैं कैलास का रहनेवाला हूं।’, असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद़्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित आणि त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज ! सद़्गुरु श्री शंकर महाराज यांचा डावा पाय मोठा, तर उजवा पाय लहान होता. त्याविषयी ते म्हणत, ‘डावा पाय स्वामींचा आणि उजवा पाय माझा आहे.’ ते स्वामींना ‘आई’ म्हणत असत आणि सांगत, ‘खरोखरच स्वामीआईने मला मांडीवर घेऊन स्वतःचे दूध पाजलेले आहे !’ सद़्गुरु श्री शंकर महाराज खरोखरच अद़्भुत आणि अतर्क्य लीलाविहारी होते.
प.पू. गोविंदकाका उपळेकर महाराज आणि सद़्गुरु श्री शंकर महाराज यांचा पुष्कळ दृढ स्नेह होता. प.पू. गोविंदकाका उपळेकर महाराज यांच्या एका भक्ताला श्री शंकर महाराजांनी ‘आम्ही आणि श्री. गोविंदकाका एकच आहोत’, अशी विशेष अनुभूती काही वर्षांपूर्वी दृष्टांताने दिली होती. खरोखर हे दोन्ही महात्मे अतिशय विलक्षण असे अवधूतच होते.
(साभार : रोहन उपळेकर यांचा ब्लॉगस्पॉट)